मागील ७० वर्षांपासुन जम्मू आणि काश्मीरमधील ३७० हे कलम कॅन्सर आजारासारखे जडलेले होते. पण हे कलम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटवले असल्याने आता त्या ठिकाणी विकास कामांना निश्चित चालना मिळेल. एवढेच नाहीतर जम्मू आणि काश्मीरमधील मूठभर माती देखील पाकिस्तानला दिली जाणार नाही, अशी भावना अखिल भारतीय दहशतवाद विरोधी मोर्चाचे अध्यक्ष मनिंदरजीत सिंह बिट्टा यांनी व्यक्त केली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या छायाचित्र आणि चित्रग्रंथाचे अनावरण बिट्टा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र गुप्ता, उत्सव प्रमुख पुनीत बालन, तसेच शहरातील मानाच्या पाचही आणि काही प्रमुख मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बिट्टा म्हणाले की, आजवर जम्मू आणि काश्मीर येथील कलम ३७० हटवण्याचा प्रयत्न कोणत्याही सरकारने केला नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेऊन जम्मू आणि काश्मीर येथील जनतेला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आहे. आता त्या संपूर्ण भागातील तरुणांना शिक्षण, रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ज्यावेळी कलम ३७० होते त्यावेळी तेथील परिस्थिती भयानक होती. येथील तरूण हातामध्ये बंदुका आणि दगडं घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. पण आता कलम ३७० हटवल्याने तिथे शांतता पाहण्यास मिळणार आहे.

तसेच यावेळी त्यांनी हे देखील म्हटले की, पूर्वी सीमा रेषेचे संरक्षण करताना हजारो सैनिक शहीद होताना पाहिले आहे. हे पाहून अनेक वेळा रडलो देखील आहे. पण आज तेथील नागरिकांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून एक समाधान मिळत असताना, पाकिस्तानकडून अण्वस्त्र युद्धाची भाषा करत आहे. हे कधीच मी आणि आपला देश खपवून घेणार नाही.