महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुण्याचा चालता-बोलता इतिहास असलेले लेखक-संपादक मधुकर श्रीधर ऊर्फ म. श्री. दीक्षित (वय ८९) यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. पुणे विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. राजा दीक्षित हे त्यांचे चिरंजीव होत.
दीक्षित यांचा जन्म १६ मे १९२४ रोजी खेड (राजगुरुनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड येथे, तर इंटर आर्टस्चे शिक्षण त्यांनी नागपूर येथे घेतले. खेड येथील न्यायालयात नोकरी केल्यानंतर ते १९४५ मध्ये पुण्याला स्थायिक झाले. १९४७ पर्यंत त्यांनी मिलिटरी अकाऊंटस खात्यामध्ये नोकरी केली. ज्येष्ठ साहित्यिक श्री. म. माटे यांच्याकडे लेखनिक म्हणून त्यांनी काम केले. माटे यांच्यामुळे दीक्षित १ एप्रिल १९४७ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून गेली सहा दशके त्यांचे परिषदेशी जिव्हाळ्याचे संबंध होते. १९७२ मध्ये नोकरीतून मुक्त झाल्यावर त्यांनी कार्यकर्ता या नात्याने परिषदेच्या कार्यामध्ये सहभाग घेतला. ९ वर्षे कार्यवाह, कोशाध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त म्हणून त्यांनी योगदान दिले. त्यांनी लिहिलेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास राज्य मराठी विकास संस्थेने पुस्तकरुपाने प्रसिद्ध केला. गेल्या सहा दशकातील बहुतांश साहित्य संमेलनांना त्यांनी हजेरी लावली होती. पुण्याच्या ७० वर्षांच्या इतिहासाचे ते साक्षीदार होते. त्यांचा ‘पुण्याचा सांस्कृतिक कोश’ असा आदराने गौरव केला जात होता.
वसंत व्याख्यानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा, थोरले बाजीराव पुतळा समिती, पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, भारत इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्र चित्पावन संस्था, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, श्री समर्थ रामदास अध्यासन या संस्थांमध्येही त्यांनी पदे भूषविली. इतिहास आणि मराठी साहित्य हे मश्रींच्या अभ्यासाचे विषय होते. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून त्यांनी ऐतिहासिक, चरित्रात्मक  लेखन केले. ‘जिजामाता’, ‘अहल्याबाई’, ‘सत्तावनचे सप्तर्षी’, ‘तात्या टोपे’, ‘प्रतापी बाजीराव’, ‘नेपोलियन’, ‘बाळाजी विश्वनाथ’, ‘साहित्यिक सांगाती’, ‘एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र’, ‘मुळा-मुठेच्या तीरेवरून’ अशी त्यांची छोटेखानी पुस्तके प्रसिद्ध आहेत. पुणे नगर वाचन मंदिराचा दीडशे वर्षांचा इतिहास त्यांनी लिहिला. अनेक स्मरणिकांचे संपादन केलेल्या दीक्षित यांनी ‘मी, म. श्री.’ या आत्मकथनातून आपला जीवनप्रवास रेखाटला आहे. दीक्षित यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.