भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांचा सवाल

आरक्षणाच्या संदर्भात शरद पवार यांनी केलेले विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाचा विचार व्हावा, असा विचार मांडला होता. त्यानंतर थयथयाट करणाऱ्या याच पवारांना अडीच वर्षांत असे काय झाले, की त्यांना आपली भूमिका ३६० अंशात बदलावी लागली, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

पर्वती मतदारसंघातील ईव्हीएम यंत्रांबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत भंडारी बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण, मराठा, धनगर व मुस्लीम समाजाची आरक्षणाची मागणी, शिवसेनेची भूमिका याबाबत त्यांनी भाष्य केले.

भंडारी म्हणाले, आरक्षणाचा विषय संविधानामध्ये आहे. आरक्षणाची भूमिका देशाच्या संविधानामध्ये समाविष्ट करताना विशिष्ट सामाजिक संदर्भ घेऊन ती केली गेली आहे. त्यामध्ये बदल करायचा झाल्यास तो संविधान परिषदेसारख्या सर्वोच्च संस्थेलाच करता येईल. लोकसभा, विधानसभेमध्ये निर्णय करता येणार नाही. मात्र, हा विषय चर्चेसाठी खुला असून त्यावर जनमत आजमावून पाहिले जाऊ शकते. मराठा, धनगर आणि मुस्लीम समाजांना आरक्षण देण्याचा विषय पंधरा वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. मागील तीन वर्षे वगळता सत्तेची सूत्रे शरद पवार यांच्याकडे होती. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असतानाही मराठा, धनगर, मुस्लीम समाजांना आरक्षण देण्याबाबतचे कोणतेही पाऊल सरकार आणि विधिमंडळ स्तरावर उचलण्यात आले नाही. मात्र, त्यांना हा प्रश्न कोणी विचारत नाही. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांच्या लक्षात ही बाब आली आहे. त्यामुळे तुम्हाला संधी असताना आरक्षणासाठी पाऊल का उचलले नाही? या त्यांच्या प्रश्नांना पवार आणि त्यांच्या पक्षाकडे उत्तर नाही. म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी आर्थिक आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला असावा.

लोकांची मागणी असेल तर वेगळे राज्य करावे, अशी छोटय़ा राज्यांची भूमिका भाजपने १९५२ पासून घेतली आहे. शिवसेनेला आम्ही मित्रपक्ष मानतो. हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांच्या मतांमध्ये फाटाफूट होऊन दोन्ही पक्षांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे असेही त्यांनी वेगळा विदर्भ आणि शिवसेनेबाबत बोलताना सांगितले.