माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची मागणी

‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना चांगली असली तरी ती घाईने राबविता कामा नये. घटनेच्या कलमामध्ये दुरुस्ती, कायद्यातील बदल, निवडणूक सुधारणा या बाबींचा समावेश करून केंद्र सरकारने श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, अशी मागणी माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांनी गुरुवारी केली. या विषयावर देशभरात चर्चा घडवून विचारमंथन झाले पाहिजे,असेही ते म्हणाले.

फर्गसन महाविद्यालयातर्फे आयोजित ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावरील चर्चासत्रात गोडबोले बोलत होते. त्यांच्यासह माजी खासदार तरूण विजय, ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम आणि ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांच्याशी सुधीर गाडगीळ यांनी संवाद साधला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर आणि फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी या वेळी उपस्थित होते.

पूर्वतयारी न करता निर्णय राबविण्याची घाई केल्यानंतर काय होते यासंदर्भात निश्चलनीकरणाचा अनुभव बोलका आहे, याकडे लक्ष वेधून गोडबोले म्हणाले, की ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना चांगली असली तरी आणखी काही काळाने ते शक्य होऊ शकेल. निवडणूक सुधारणांबाबतचे प्रश्न सर्वच राजकीय पक्षांनी ७० वर्षे प्रलंबित ठेवले. त्यामुळे मतदान सक्तीच्या विषयावर चर्चाच होऊ शकलेली नाही.

तरुण विजय म्हणाले,की गेल्या ३० वर्षांत देशात कोठे ना कोठे निवडणूक नाही असा एकही महिना गेला नाही. राजकीय पक्ष आणि प्रशासन निवडणुकांमध्ये व्यग्र राहिले तर नियोजन, विकास कार्यक्रम कधी राबविणार हा प्रश्न उरतोच. एकाचवेळी निवडणुका झाल्यास त्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसू शकेल.

‘एक देश एक निवडणूक’ हा प्रश्न राष्ट्रीय पक्षांपुरता मर्यादित आहे, याकडे लक्ष वेधून संगोराम म्हणाले,‘ २० लाख कोटी मतदारांसाठी निवडणूक घेण्याचा खर्च हा साडेतीन ते चार हजार कोटी रुपये एवढाच येतो. निवडणुकीमध्ये काळा पैसा खर्च होतो. प्रादेशिक पक्षांना अन्य राज्यांतील निवडणुकांशी घेणे-देणे नाही. राज्यातील मुद्दे वेगळे असतात. निवडणुका ठरविताना हवामानाचा विचार केला जातो. एक निवडणुका घेण्यामागे राजकीय गणित असले पाहिजे.’ बाविस्कर म्हणाले, एक निवडणुका विचार महत्त्वाचा असला तरी तो अव्यवहार्य आहे. यामध्ये प्रादेशिक पक्षांचा विचार करावा लागेल. समाजाला गृहीत धरून निर्णय होऊ नयेत. त्याचे पालकत्व समाजाकडे असले पाहिजे.