|| प्रथमेश गोडबोले

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीपासून पुढे काही अंतरावर मधुबन सोसायटी आहे. सोसायटीत वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, गिर्यारोहण, क्रीडाविषयक असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यात लहान मुले, तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रिय सहभाग असतो. राष्ट्रीय सणांसह सर्व उत्सव केवळ साजरे न करता त्यांचे औचित्य साधून विविध उपक्रमही राबवण्यात येतात. रक्तदान शिबिर, सोसायटीमधील सभासदांचे वाढदिवस साजरे करणे, लहान मुलांना मैदानी खेळांचे महत्त्व प्रत्यक्ष खेळांद्वारे दाखवणे अशा उपक्रमांसह गिर्हारोहण मोहिमाही आयोजित केल्या जातात. गणेशोत्सव, दिवाळी हे सणही एकत्रितरीत्या साजरे केले जातात. एकोपा जपणारी सोसायटी अशी या सोसायटीची ओळख आहे.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीपासून काही अंतरावर साडेतीनशे सदनिका आणि नऊ इमारतींची मधुबन सोसायटी आहे. एकोपा जोपासणारी सोसायटी अशी सोसायटीची ओळख आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट आणि प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण सोसायटीत मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. याबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमातही सोसायटीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असतो. गणेशोत्सवात, नवरात्र उत्सवात महिला आणि लहान मुलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, रंगपंचमी, दहिहंडी असे विविध सण-उत्सवही सोसायटीमधील सर्व सदस्य उत्साहाने साजरे करतात. सोसायटीमधील सदस्यांचा वाढदिवस सोसायटी स्तरावर साजरा केला जातो. त्या माध्यमातून सोसायटी म्हणजे एक कुटुंबच असल्याची भावना वाढीस लागण्याला मदत होते. हे सर्व उत्सव, सण साजरे करताना ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग असतो हे विशेष.

सोसायटीच्या सदस्यांनी सामाजिक भानही जपले आहे. भारतीय लष्करातील अधिकारी शहीद मेजर शशीधरन नायर यांच्या स्मरणार्थ सोसायटीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मेजर शशीधरन नायर यांच्या मातोश्रींसह नायर कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. या शिबिरामध्ये सोसायटीमधील पंचवीस महिलांसह १०१ जणांनी आणि शशीधरन यांच्या कुटुंबातील दोन जणांनी रक्तदान करून शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

मैदानी खेळांचे महत्त्व अबाधित राहण्यासाठी सोसायटी अंतर्गत लहान मुलांसाठी मधुबन क्रिकेट क्लबमार्फत दर तीन महिन्यांनी क्रीडाविषयक उपक्रम राबवण्यात येतात. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात येते. या स्पर्धेतून विविध विषयांद्वारे लहान मुलांच्या कल्पनांना वाव दिला जातो. या स्पर्धा पार पडल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करून विजेत्यांना आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सदस्यांना गौरविण्यात येते. सोसायटीमधील काही सदस्यांनी रायगड किल्ल्यावर गिर्यारोहण मोहीमही आयोजित केली होती. दिवाळीत सोसायटीमध्ये दिव्यांची आरास केली जाते.

एके दिवशी भारती रुग्णालयात एका अवघ्या सात महिन्याच्या बाळाला ‘ओ-निगेटिव्ह’ रक्तगटाची गरज असल्याचे सिंहगड भागातील केतन घोडके यांना समजले. अनेकवेळा रक्तदात्याची, रक्ताची गरज असल्याचे समाजमाध्यमांवरून येणारे संदेश जुने असतात किंवा त्यामध्ये फारसे तथ्य नसते. मात्र, आलेल्या संदेशावर संपर्क साधल्यानंतर खरोखरच रक्ताची गरच असल्याचे समजले. मधुबन सोसायटीमधील प्रवीण पादिर यांचा रक्तगट ‘ओ-निगेटिव्ह’ आहे. सोसायटीमधील कौस्तुभ सावंत यांनी तातडीने प्रवीण यांना रक्तदानाबाबत कळवले आणि त्यांनी स्वेच्छेने भारती रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. विशेष म्हणजे सोसासटीमध्ये काही दिवसांपूर्वीच रक्तदानाबाबत जनजागृती संबंधीची बैठक पार पडली होती. त्याचाही फायदा या वेळी झाल्याचे सोसायटीतील सदस्यांकडून आवर्जुन सांगण्यात आले.

सोसायटीतील युवक-युवती सामाजिक कार्यात सहभागी आहेत. शहराच्या विविध भागांतून, परगावहून आलेली कुटुंब सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने वास्तव्य करत आहेत. त्यामुळे इथे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. नवीन विचार-आचाराची सोसायटी तसेच सोसायटीने राबवलेल्या उपक्रमांसाठी मधुबन सोसायटी ओळखली जाते. एकाच सोसायटीत राहत असल्याने सर्व कुटुंबांचे परस्पर जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असून सर्व सभासद एका कुटुंबाप्रमाणे कार्यरत आहेत. त्याचा फायदा एखादा उपक्रम, मोहीम राबवण्यासाठी होतो. सोसायटीचे कौस्तुभ सावंत, अमित सातपुते, विजय मारणे, रवींद्र वसुले, राहुल रिंढे, दिनेश वर्मा, प्रवीण पादीर, युवराज खैरे, सुनील पाटील, केदार हवळ आणि शरद टोकले हे आणि असे अनेकजण सोसायटीतील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करतात.

prathamesh.godbole@expressindia.com