युरोपिअन बँकेबरोबर आज करार

पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी युरोपिअन बँकेकडून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला एक हजार ६०० कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यानुसार दोनशे दशलक्ष युरोच्या (एक हजार सहाशे कोटी) कर्जासाठी संयुक्त करार करण्याची प्रक्रिया शुक्रवारी (३१ जानेवारी) होणार आहे.

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांची कामे वेगात सुरू आहेत. या मार्गिकांसाठी एकूण ११ हजार ४२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या मार्गिकांसाठी त्यांचा त्यांचा हिस्सा देणार आहेत. उर्वरित रक्कम कर्जाद्वारे उपलब्ध करून घेतली जाईल. त्याअंतर्गत युरोपिअन इनव्हेस्टमेंट बँक आणि एएफडी फ्रान्स या दोन वित्तीय संस्थांकडून कर्जपुरवठा होणार आहे. यापूर्वीही मेट्रोच्या कामासाठी या दोन्ही संस्थांनी मेट्रोला वित्तीय साहाय्य केले असून पुढील टप्प्यात युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून एक हजार ६०० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून एकूण ६०० दशलक्ष युरो कर्ज मिळणार आहे. त्याअंतर्गत २०० दशलक्ष युरोसाठी केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या आर्थिक करारावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे.

मुंबईत हा कार्यक्रम होणार असून कर्ज स्वरूपात उपलब्ध झालेला हा निधी नागरी कामांसाठी वापरण्यात येणार आहे, तसेच स्थानके, डेपो आणि भूमिगत मेट्रो मार्गिकेची अनुषंगिक कामे या निधीतून पूर्ण करण्यात येतील.

कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँक अधिकाऱ्यांच्या एक पथकाने शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शिवाजीनगर सत्र न्यायालय ते रामवाडी, कृषी महाविद्यालय येथे सुरू असलेले भुयारी मार्गिकेचे काम, टनेल बोअरिंग मशिनची कार्यप्रणाली आदींची पाहणी या पथकाकडून करण्यात आली. बँकेचे उपाध्यक्ष अँड्रय़ू मॅकडोवेल यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानुसार २०० दशलक्ष युरो कर्ज पुरवठय़ासाठी करार होणार असून महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, बँकेचे उपाध्यक्ष अँड्रय़ू मॅकडोवेल आणि मारिया शॉ बर्रागन यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. या निधीमुळे मेट्रोची कामे वेगात पूर्ण होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.