देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील चेरापुंजीलाही मागे टाकत गेल्या दोन-तीन वर्षांत सर्वाधिक पावसाची नोंद होत असलेल्या महाबळेश्वरमधील पाऊस यंदा मात्र पहिल्या टप्प्यापासूनच मागे पडला आहे. तीन वर्षांची कसर भरून काढत चेरापुंजीतील दमदार पावसाने पुन्हा देशात आघाडी घेतली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाच्या नोंदी घेण्यात येणाऱ्या विभागात सर्वाधिक पावसाच्या स्थळांमध्ये मुंबई आणि रत्नागिरीचाही समावेश झाला आहे.

देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठय़ा पावसाची नोंद होते. यात चेरापुंजीने आजवर पावसाच्या प्रमाणाचे मोठे विक्रम केले असल्याने देशातील सर्वाधिक पावसाच्या स्थळांपैकी ते एक ठिकाण समजले जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांतील स्थिती पाहिल्यास चेरापुंजीत पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते.

याच वेळी महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यतील महाबळेश्वर आणि पुणे जिल्ह्यतील ताम्हिणीच्या घाटक्षेत्रातील पाऊस चर्चेत आला. २०१८ आणि २०१९ या सलग दोन वर्षांत महाबळेश्वरमध्ये पावसाने विक्रम नोंदवित चेरापुंजीला मागे टाकले होते. यंदा मात्र ही स्थिती पूर्णपणे बदलली असून, महाबळेश्वरमधील पाऊस हंगामातील आजवरची सरासरीही पूर्ण करू शकलेला नाही.

महाबळेश्वरमध्ये २०१८ मध्ये ऑगस्टच्या सुरुवातीलाच ५७०० मिलिमीटरच्या आसपास पाऊस झाला होता.

सर्वाधिक पावसाची नोंद

ठिकाण                           पाऊस

चेरापुंजी                   ७३७१ मिलिमीटर

होनावर (कर्नाटक)           ३११५ मिलिमीटर

महाबळेश्वर               २९८५मिलिमीटर

रत्नागिरी                 २८५५ मिलिमीटर

पणजी                  २६८६मिलिमीटर

मंगळुरू                  २४५५ मिलिमीटर

मुंबई                    २४५० मिलीमीटर