News Flash

कृषिपदवी प्रवेश प्रक्रियेबाबत‘महाआयटी’ ला कानपिचक्या

प्रवेश वाटप पत्रावर नमूद केलेल्या माहितीनुसार प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ता आदींबाबतची कागदपत्रे उमेदवाराने अपलोड केली नाही.

पुणे : कृषिपदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक गोंधळामुळे राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) महाआयटीला कानपिचक्या दिल्या आहेत. शैक्षणिक प्रक्रियेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याची सूचना सेलचे आयुक्त चिंतामणी जोशी यांनी महाआयटी आणि महाविद्यालयांना दिल्या आहेत.

सीईटी सेलकडून कृषिपदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी ‘महाआयटी’कडे देण्यात आली आहे. मात्र या प्रवेश प्रक्रियेत सातत्याने अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत परिपत्रकाद्वारे स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

प्रवेश वाटप पत्रावर नमूद केलेल्या माहितीनुसार प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ता आदींबाबतची कागदपत्रे उमेदवाराने अपलोड केली नाही. मात्र, प्रवेशाच्या वेळी उमेदवाराकडे आवश्यक ती मूळ कागदपत्रे उपलब्ध असल्यास त्याला प्रवेश देण्यात यावा. केवळ कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा चुकीच्या ठिकाणी अपलोड केल्याच्या सबबीखाली प्रवेश रद्द करू नयेत. याबाबतची मूळ कागदपत्रे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मंजुरीपर्यंत महाविद्यालयांनी जतन करून ठेवावीत. महाविद्यालय आणि महाआयटी यांनी संगणकातील माहिती अद्ययावत करावी. तसेच, प्रवेश प्रक्रिया समाप्तीनंतर महाविद्यालयांनी अशी प्रकरणे स्वतंत्ररीत्या सीईटी सेलकडे सादर करावीत, अशा सूचना जोशी यांनी दिल्या आहेत.

तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये नमूद केलेला प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबी आदी संदर्भात उमेदवारांकडून हरकत घेतलेली नसताना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवर्ग, अधिभार, गुणवत्ताविषयक बाबींसंदर्भात बदल असल्यास आणि त्याविषयी उमेदवारांकडून हरकत उपस्थित झाल्यास त्याबाबतची शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. छाननी अधिकाऱ्याच्या समन्वयाने योग्य त्या सुधारणा महाआयटीने कराव्यात. या सुधारणांनुसार पुढील प्रवेश फेरीचे प्रवेश जाहीर करून प्रवेश फेरी राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 2:24 am

Web Title: mahait on agriculture degree admission process akp 94
Next Stories
1 वरिष्ठ मंत्र्यांनी पुढाकार घेतल्यास शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा
2 ‘एनसीएल’, ‘आयसर’कडून करोना लशींच्या परिणामकारकतेचा अभ्यास
3 पुण्यात दिवसभरात १८० नवे करोनाबाधित, पिंपरी-चिंचवडमध्ये १०६ रुग्णांची नोंद
Just Now!
X