खर्चाच्या दृष्टीने नियोजन करण्याची महापालिकेची तयारी

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांचे काम सुरू झाले असतानाच मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार स्वारगेट ते कात्रज असा मेट्रो मार्ग करण्यास महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शविली असून हा मार्ग सुरू करण्यासंदर्भात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून मेट्रोच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही करण्यात आली आहे. मार्गासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दर्शविली आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी मेट्रोचा पर्याय पुढे आला. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास सात वर्षे लागली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांचे काम टप्प्याटप्पाने सुरू झाले. हे काम सुरू होताच मेट्रोच्या विस्तारीकरणाची मागणीही नगरसेवकांकडून सुरू झाली होती. महापालिकेच्या मुख्य सभेतही सर्वपक्षीय नगरसेवकांनी तशी मागणी केली होती. मात्र ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सभागृहनेता श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि पदाधिकाऱ्यांची महामेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच मुंबईते चर्चा झाली. या चर्चेत मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली. हे काम करण्यास महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनीही तयारी दर्शविली. त्याची माहिती सभागृहनेता श्रीनाथ भिमाले यांनी दिली.  स्वारगेट-कात्रज मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) तयार करावा लागणार आहे. त्यासाठी साठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

त्यापैकी तीस लाख रुपये देण्याची महापालिकेची तयारी आहे. तर या मार्गाच्या कामासाठी तीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तीनशे कोटींपैकी पन्नास टक्के रक्कम महापालिकेने देण्यासंदर्भात चर्चा झाली असून राज्य शासनाकडून उर्वरित रक्कम मिळवता येईल का, यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच एकूण कामाच्या खर्चासाठी अंदाजपत्रकातही आवश्यक ती तरतूद करण्यात येईल, अशी माहिती श्रीनाथ भिमाले यांनी दिली.