मूळचे पुण्यातील असलेले आणि गेली तीन दशके अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले महांतेस हिरेमठ यांची अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये तांत्रिक सल्लागार या पदावर नियुक्ती झाली आहे. सप्टेंबरमध्ये त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून अमेरिकन सिनेटर्सबरोबर ते एक वर्ष कालावधीसाठी काम करणार आहेत.
महांतेश हे स्व. एस. जी. हिरेमठ आणि शिवगंगा हिरेमठ यांचे पुत्र. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. तर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअिरग) ही पदवी घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकारी म्हणून त्यांनी चार वर्षे भारतीय रेल्वेमध्ये काम पाहिले. १९८२ मध्ये ते अमेरिकेला गेले. तेथे स्ट्रक्चरल इंजिनिअिरगमधील डॉक्टरेट पूर्ण केले. प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ. शिरीष हिरेमठ आणि डॉ. जगदीश हिरेमठ यांच्यासह स्थापत्य अभिंयते मृत्युंजय हिरेमठ हे त्यांचे बंधू आपापल्या क्षेत्रातील डॉक्टरेट आहेत.
महांतेश यांना गेल्या २५ वर्षांतील अनुभवाचा फायदा झाला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील बऱ्याच विभागामध्ये त्यांनी काम केले असून अमेरिकेमध्ये झालेल्या बऱ्याच मुलाखतींमधून उत्तीर्ण होत त्यांनी काँग्रस सेशनल फेलोशिप ऑफ व्हाईट हाऊस हा किताब पटकाविला आहे. या पदामुळे त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती डॉ. जगदीश हिरेमठ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.