रक्तातील अनुवांशिक घटकांमुळे उद्भवणाऱ्या ‘सिकल सेल अ‍ॅनीनिया’ या जनुकीय आजाराच्या गोरगरीब रुग्णांवरील उपचार आणि या विकाराच्या उपचारांबाबत संशोधन करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. अंकलखेडा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथे हे रुग्णालय उभारण्यात येणार असून हे शिवधनुष्य पेलण्यासाठी संस्थेला समाजातील दानशूरांकडून अर्थसाह्य़ाची अपेक्षा आहे.

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र आरोग्य मंडळाने सिकल सेल अ‍ॅनीमिया या रक्तातील अनुवांशिक घटकांमुळे उद्भवणाऱ्या जनुकीय आजारावरील उपचारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून निवृत्त झालेले प्राध्यापक-संशोधक आणि महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी डॉ. सुदाम काटे यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचा चमू रुग्णांवरील सदैव तत्पर असतो. रक्ताचे नमुने तपासण्याचे काम करीत असताना डॉ. काटे यांना १९७२ मध्ये खेतिया (ता. शहादा) येथे पावरा या आदिवासी समाजामध्ये सिकल सेलचे रुग्ण आढळले. काटे यांचा तेथूनच अभ्यास सुरू झाला. त्यासाठी त्यांना ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ची (आयसीएमआर) मदत झाली. १९९८ पासून संस्थेचे धडगाव (जि. नंदूरबार) येथे काम सुरू झाले. वैद्य य. गो. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक वनस्पतींपासून तयार केलेल्या औषधाने रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढून त्यांचा त्रास कमी करण्यात संस्थेला यश आले. धडगाव येथील भीमसिंग पावरा यांच्या मुलीचे सिकल सेलमुळे निधन झाले. तिची आठवण म्हणून त्यांनी आपल्या जमिनीचा काही भाग संस्थेला देणगी दिला. २००४ मध्ये रोषमाळ बुद्रुक येथे या नव्या इमारतीमध्ये सिकल सेलचा स्थायी दवाखाना सुरू झाला. संस्थेतर्फे दर दोन महिन्यांनी आयुर्वेद महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने शिबिरे आयोजित केली जातात. महाराष्ट्राच्या विविध भागासह गुजरात, मध्य प्रदेश सीमेवरील अनेक आदिवासी रुग्ण शिबिरासाठी येतात. आजपर्यंत संस्थेने सिकल सेलचे १२०० रुग्ण शोधून काढले असून त्यांच्यावर नियमितपणे मोफत उपचार करण्यात येतात. या कामासाठी महाराष्ट्र आरोग्य मंडळाला गुजरात सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. आता सिकल सेलवरील उपचार आणि संशोधन करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प संस्थेने हाती घेतला आहे. या कामाला जनतेचे पाठबळ आवश्यक असून समाजातील दानशूर या विधायक कार्याच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास संस्थेचे सचिव अनिल गुजर यांनी व्यक्त केला.

साने गुरुजी यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन डॉ. सि. तु. ऊर्फ दादा गुजर यांनी डॉ. बाबा आढाव आणि आपल्या दोन डॉक्टर मित्रांच्या सहकार्याने ११ जून १९६० रोजी त्याकाळी ग्रामीण भाग असलेल्या हडपसर येथे महाराष्ट्र आरोग्य मंडळ आणि साने गुरुजी आरोग्य केंद्राची स्थापना केली. गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्याच्या उद्देशातून स्थापन झालेल्या या संस्थेने ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे. साने गुरुजी रुग्णालय, सुमतिभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. दादा गुजर आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षण व संशोधन संस्था असा संस्थेचा आरोग्य क्षेत्रातील विस्तार झाला आहे. डॉ. दादा गुजर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अनिल गुजर यांनी संस्थेच्या सचिवपदाची धुरा समर्थपणे पेलली असून अत्यल्प दरामध्ये रुग्णसेवा हा दादांचा वारसा यशस्वीपणे चालविला जात आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि भारती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील हे महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संस्थेच्या कामाची माहिती घेतली असून करकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी संस्थेच्या कार्यक्रमाला आवर्जून भेट दिली आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्रा. ग. प्र. प्रधान यांनी आयुष्याची संध्याकाळ साने गुरुजी रुग्णालयामध्येच व्यतीत केली होती. प्रधान यांच्यासह मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई आणि सामाजिक कार्यकर्ते ताहेरभाई पूनावाला यांच्या पार्थिवाचे देहदान संस्थेकडे करण्यात आले होते.