पुणे : काश्मीरमध्ये दगडफेकीसाठी, तसेच ईशान्येतील राज्ये आणि कर्नाटकसह अनेक राज्यांत अतिरेक्यांना पैसे पुरविण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या रमेश शहा (वय २८) याला उत्तर प्रदेश आणि पुणे दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून तीन दिवसांची कोठडी घेण्यात आली.

शहा हा गोरखपूरमधून गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. पुण्यामध्ये नऱ्हे येथे तो लपला असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क केला. मंगळवारी सकाळी तो राहत असलेल्या खोलीवर छापा घालून त्याला ताब्यात घेण्यात आले.  सुमारे १५ दिवसांपूर्वी तो पुण्यात आला होता. एकाच्या ओळखीच्या मदतीने त्याने नऱ्हे येथे एक खोली घेतली होती.

गोरखपूर ‘टेरर फंडिग’च्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश शहा हा मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. शहा हा बिहारमधील गोपळगंज येथील राहणारा असून गोरखपूर येथे एक शॉपिंग मार्केट चालवितो. हे प्रकरण बाहेर आल्यापासून तो फरार होता. अनेक राज्यांमध्ये त्याचा शोध घेतला जात होता.

पाकिस्तान आणि अतिरेक्यांच्या हस्तकांमध्ये सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाण-घेवाण झाल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला. ही रक्कम मध्यपूर्वेतून येत होती. तिचे वितरण काश्मीर, ईशान्येकडील राज्यांसह इतर भागांत  केले जात होते. इंटरनेटच्या माध्यमातून ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वितरित करण्यात आली.