09 July 2020

News Flash

Maharashtra HSC Board Exams 2020 : बारावीची परीक्षा आजपासून

परीक्षा कक्षात अर्धा तास आधी पोहोचणे आवश्यक

(संग्रहित छायाचित्र)

परीक्षा कक्षात अर्धा तास आधी पोहोचणे आवश्यक

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवारपासून (१८ फेब्रुवारी) सुरू होत आहे. परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी वाढली आहे. विद्यार्थ्यांना वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात पोहोचणे आवश्यक असून, अकरा वाजेपर्यंतच कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.

राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले या वेळी उपस्थित होते. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत परीक्षा होईल. परीक्षेसाठी राज्यभरात यंत्रणा सज्ज झाली आहे.

परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळातर्फे विभागीय मंडळांच्या माध्यमातून भरारी पथके नेमण्यात आली आहेत. सर्व जिल्ह्य़ात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांना मोबाइल वापरण्यास बंदी असून केंद्रसंचालकांकडे मोबाइल जमा करायचे आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेआधी म्हणजे साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अकरा वाजेपर्यंतच परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असून अकरा वाजल्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याच्या कारणाची केंद्रप्रमुख पडताळणी करून प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेतील. विद्यार्थ्यांना परीक्षा साहित्याशिवाय स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशा अन्य कोणत्याही वस्तू परीक्षा कक्षात नेता येणार नाहीत, असे डॉ. काळे यांनी सांगितले.

एकूण आकडेवारी

’ परीक्षा केंद्रे – ३ हजार ३६

’ नोंदणी केलेले विद्यार्थी – १५ लाख ५ हजार २७

’ परीक्षार्थी मुले – ८ लाख ४३ हजार ५५२

’ परीक्षार्थी मुली – ६ लाख ६१ हजार ३२५

’ अपंग विद्यार्थी – ६ हजार ६५७, तृतीयपंथी विद्यार्थी – १५०

’ भरारी पथके – २७२

’ कनिष्ठ महाविद्यालये – ९ हजार ९२३

’ शाखानिहाय विद्यार्थी

– विज्ञान (५ लाख ८५ हजार ७३६), कला (४ लाख ७५ हजार १३४), वाणिज्य (३ लाख ८६ हजार ७८४), व्यावसायिक अभ्यासक्रम (५७ हजार ३७३)

माहिती तंत्रज्ञानची परीक्षा ऑनलाइन

माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी १ लाख ३३ हजार ७३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १ हजार ६६९ केंद्रांवर ही परीक्षा होईल. सामान्यज्ञान या विषयाची परीक्षाही ऑनलाइनच होणार असून, ४२ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ३ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

प्रश्नपत्रिकांच्या आराखडय़ात बदल

यंदाच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येऊ  नये, यासाठी महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या परीक्षांमध्ये खंड (सुटी) ठेवण्यात आला आहे.

हेल्पलाइन क्रमांक

’ राज्य मंडळ – (०२०) २५७०५२७१, २५७०५२७२

’ पुणे – ७०३८७५२९७२

’ नागपूर – (०७१२) ५६५४०३, २५५३४०१

’ औरंगाबाद – (०२४०) २३३४२२८, २३३४२८४

’ मुंबई – (०२२) २७८८१९७५, २७८९३७५६

’ कोल्हापूर – (०२३१) २६९६१०१, ०२, ०३

’ अमरावती – (०७२१) २६६२६०८

’ नाशिक – (०२५३) २५९२१४३

’ लातूर – (०२३८२) २५१७३३

’ कोकण – (०२३५२) २२८४८०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 2:18 am

Web Title: maharashtra board hsc exams start from today zws 70
Next Stories
1 त्याच जागी पुन्हा तसाच फलक
2 शहराला उन्हाळ्याची चाहूल..
3 पिंपरी महापालिकेच्या अंदाजपत्रकात नावीन्य नाही 
Just Now!
X