पालकमंत्र्यांच्या मुलाच्या विवाहासाठी राज्याचे मंत्रिमंडळ आज पुण्यात

पालकमंत्री गिरीश बापट यांचा मुलगा गौरव याचा विवाह समारंभ बुधवारी (२१ फेब्रुवारी) एरंडवणे येथील डीपी रस्त्यावर असणाऱ्या शुभारंभ लॉन्स येथे होत असून या विवाह सोहळय़ासाठी राज्य मंत्रीमंडळातील तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. विवाह सोहळय़ासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन डीपी रस्त्यावर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, तसेच या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून तेथे अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांचा मुलगा गौरव याचा विवाह समारंभ डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटे या मुहूर्तावर होणार आहे. पालकमंत्री बापट हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा बापट विजयी झाले आहेत. बापट यांचे सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे विवाह सोहळय़ासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यातील वेगवेगळय़ा भागातील आमदार आणि कार्यकर्ते या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून डीपी रस्ता परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाक रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार कोथरूड वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी डीपी रस्त्याची पाहणी केली. परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ रेखा साळुंखे आणि कर्मचारी डीपी रस्त्यावर बंदोबस्तासाठी राहणार आहेत. याबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी देण्यात येणारा विशेष सुरक्षा विभागाचा (एसपीयू) बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

डीपी रस्त्यावरील खड्डे बुजविले

डीपी रस्त्यावर क्राँकिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम अर्धे पूर्ण झाले आहे. डीपी रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या भागातील खड्डे बुजवण्यात यावेत, असे पत्र वाहतूक पोलिसांकडून महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार डीपी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात आले आहेत.

दोन ठिकाणी पार्किंग व्यवस्था

पालकमंत्री बापट यांच्या मुलाच्या विवाह सोहळय़ासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या भागात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या वाहनांच्या ताफ्यासाठी दोन ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विवाह समारंभासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी  साडेबारा वाजेपर्यंत मोठी गर्दी होणार आहे. दुपापर्यंत या भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.