मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एक वेगळाच अंदाज, पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाला. १३ व्या अखिल भारतीय पोलिस नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात उद्धव ठाकरे हजर होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी, विजेत्या स्पर्धकांचं अभिनंदन करताना खुमासदार फटकेबाजी केली.

“राजकारणात आणि पोलिसात फरक आहे. राजकारणात ‘कही पे निगाहे कही पे निशाना’ असं असत. मात्र, तुमचं ज्या ठिकाणी निशाणा आहे तिथेच असतो. तुमचा नेम कधीच चुकत नाही”, उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यापुढे बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, “अवघ्या देशातून साडेपाचशे स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आपण विविध राज्यातून आलेला आहात. मला तर वाटत हिंदुस्थाना मधील प्रत्येक पोलिसांचा निशाणा योग्य लागला पाहिजे. पोलिसांची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे आणि ती आम्ही घेऊ.”

यावेळी बोलत असताना, तुमच्यात जिंकण्याची जिद्द हवी…तुमचा विजय निश्चीत आहे अशा शब्दांत विजेत्या स्पर्धकांचं मनोधैर्य वाढवलं. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उप-सभापती नीलम गोऱ्हे, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम आदी उपस्थित होते.