06 March 2021

News Flash

“माझ्याव्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा,” अजित पवारांनी पोलिसांसमोर भरला सज्जड दम

"महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी...,"

संग्रहित छायाचित्र

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. शहरातील गुन्हेगारी बंद झाली पाहिजे. तसंच वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत, सामान्य नागरिकांचे नुकसान झाले. त्यात त्यांचा काय दोष? गुंडांकडून होणारा त्रास थांबला पाहिजे असं अजित पवारांनी सांगितलं आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर माई ढोरे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, “राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगतो की, तो कुठल्या पक्षाचा, गटाचा, याचा विचार न करता महाविकास आघाडीचं सरकार असलं तरीदेखील गुन्हेगारीच्या निमित्ताने चुकीचं वागत असेल तर त्याला कडक शासन करा. मी तुमच्यासोबत आहे. अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा, मग मी त्या फोनवाल्या व्यक्तीकडे बघतो. माझी मतं आणि भूमिका स्पष्ट असते,” असं अजित पवारांनी म्हटलं.

चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट
अजित पवार म्हणाले की, “करोना काळात केलेल्या कामामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना पुणे शहरात घडली. चोरांना घाबरून रात्री गस्तीवर असलेले दोन पोलीस पळून गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमधून उजेडात आली. चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे. उलट चोरांना बघून पोलीस पळतात हे असं करता कामा नये. त्या दोघांवर कारवाई केली. परंतु अश्या घटनांमुळे पोलिसांची प्रतिमा समाजात खराब होते”.

पुढे ते म्हणाले की, “पोलिसांच्या मनोबलावर याचा वाईट परिणाम होतो. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. याची नोंद सर्वांनी घ्यायला हवी. अशा घटना पुन्हा कदापी घडू नयेत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे अशी ताकीद त्यांनी पोलिसांना दिली आहे”.

पोलिसांच्या कामाची इतिहासात नोंद
“पोलिसांनी करोना काळात जोखीम पत्करून केलेल्या कामाला तोड नाही. ते कर्तव्य पार पाडत असताना पोलीस बांधवांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात घेतली जाईल,” अशी प्रशंसादेखील अजित पवारांनी यावेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 2:24 pm

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar on crime in pune pimpri chinchwas kjp 91 sgy 87
Next Stories
1 चोर आले म्हणून पोलीस पळून जातात ही केविलवाणी गोष्ट- अजित पवार
2 पुण्यातील शारदा गजानन मंदिरात चोरी, घटना CCTV मध्ये कैद
3 आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी थकबाकी वसुलीवर ‘महावितरण’कडून भर
Just Now!
X