राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भाजपा नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला लगावला. यावर अजित पवारांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात सर्किट हाऊस येथे अजित पवार आले होते.

“इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत”

“ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

निलेश राणे काय म्हणाले आहेत?
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.

निलेश राणे यांनी यावेळी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं आहे. “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला,” असं त्यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादीत चाललंय काय?? इतके क्रिमिनल मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

मुंडे यांच्यावरील आरोपांना नवी कलाटणी
मुंडे यांच्यावरील आरोपांना नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.