यंदापासून देशभरातील दोन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

पुणे : यंदापासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (एनटीएस) एक हजार ऐवजी दोन हजार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या कोटय़ात दुपटीने वाढ केली आहे. आता महाराष्ट्राचा कोटा दुप्पट झाला असून, राज्यातील ७७४ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा देता येईल.

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रज्ञाशोध परीक्षा देता येते. राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तर अशा दोन स्तरावर ही परीक्षा वर्षांतून एकदा घेतली जाते. त्यात राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येते. राज्यस्तरावरील परीक्षा ४ नोव्हेंबरला घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी ८६ हजार २८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८१ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. राज्यभरातील २७२ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेत एकूण ४५ हजार १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एनसीईआरटीने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी महाराष्ट्रासाठी ३८७ विद्यार्थ्यांचा कोटा निश्चित केला होता. त्यानुसार ३८७ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती.

‘केंद्र सरकारने या वर्षीपासून दोन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनसीईआरटीने महाराष्ट्राच्या कोटय़ात वाढ केली. त्यामुळे वाढलेल्या कोटय़ाच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी विद्यार्थी पाठवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे,’ अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली.