टोमॅटो, हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ

शेतकरी संपाच्या दहाव्या दिवशी घाऊक बाजारात रविवारी फळभाज्यांची नियमित आवक झाली. शेतकरी संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. टोमॅटो, हिरवी मिरची, घेवडा, मटार, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. काकडीचे दर उतरले आहेत.

गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून १४० ते १५० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. हिमाचल प्रदेशातून २ ट्रक मटार, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून ५ ते ६ ट्रक कोबी, कर्नाटक, तामिळनाड, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मिळून ५ ते ६ ट्रक कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, राजस्थान येथून ५ ते ६ टेम्पो गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी ५ ते ६ टेम्पो, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून लसूण चार ते साडेचार हजार गोणी अशी आवक बाजारात झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली.  पुणे विभागातून सातारी आले १३०० ते १४०० पोती, टोमॅटो तीन ते साडेतीन हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी १४ ते १५ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, गावरान कैरी ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग २०० पोती, गाजर ४ ते ५ टेम्पो, कांदा ८० ट्रक, आग्रा, इंदूर आणि तळेगाव येथून मिळून नवीन बटाटा ६० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

पावसामुळे फळांना मागणी कमी

पावसामुळे फळांना फारशी मागणी नाही. कलिंगड, खरबूज, पपई, डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. चिक्कूच्या दरात वाढ झाली आहे. मोसंबी, संत्र्याचे दर स्थिर आहेत. रविवारी फळबाजारात अननस ७ ट्रक, मोसंबी १५ टन, डाळिंब २४ ते ३० टेम्पो, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे चार ते पाच हजार गोणी, चिक्कू ५०० डाग, पेरू १०० ते १२५ क्रेट्स (प्लास्टिक जाळी), कलिंगड २० ते २५ टेम्पो, खरबूज १० ते १५ टेम्पो अशी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कोथिंबिरीची आवक वाढली; पालेभाज्यांचे दर तेजीत

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी दीड लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली. त्या तुलनेत मेथीची आवक कमी झाली असून घाऊक बाजारात मेथीच्या २५ हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे.  पालेभाज्यांचे तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पालेभाज्यांचे दर (शेकडा जुडी) पुढीलप्रमाणे- कोथिंबीर- ५०० ते १०००, मेथी- ८०० ते १५००, शेपू- ८०० ते १०००, कांदापात- ५०० ते १२००, चाकवत- ५०० ते ६००, करडई- ५०० ते ६००, पुदिना- २०० ते ३००, अंबाडी- ८०० ते १०००, मुळा-५०० ते १०००, राजगिरा- ५०० ते ७००, चुका- ८०० ते १०००, चवळई-४०० ते ७००, पालक- ५०० ते ७००

मासेमारी बंद; मासळीचे दर तेजीत

पावसाळा सुरू झाल्यानंतर किनारपट्टीवरील मासेमारी बंद करण्यात आली आहे. मासेमारी बंद झाल्यानंतर आवक कमी झाली आहे. मागणी चांगली असल्याने मासळीचे दर १० ते २० टक्क्य़ांनी वाढले आहेत. वातावरणातील बदलामुळे इंग्लिश अंडय़ांना मागणी वाढली आहे. इंग्लिश अंडय़ांच्या दरात शेकडय़ामागे १३ रुपयांनी वाढ झाली आहे. देशी अंडय़ांच्या दरात शेकडय़ामागे ३० रुपयांनी वाढ झाली आहे. चिकन व मटणाचे दर स्थिर आहेत. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी गुजरात आणि आंध्र प्रदेशातून मिळून खोल समुद्रातील मासळी ४ ते ५ टन, खाडीतील मासळी १५० ते २०० किलो, नदीतील मासळी ५०० ते १ हजार किलो, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सिलन या मासळीची १ ते २ टन अशी आवक झाल्याची माहिती मासळीबाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी आणि चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी दिली.