22 April 2019

News Flash

राज्यातील थंडीत वाढ; पावसाचीही पुन्हा शक्यता

तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुन्हा तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : ढगाळ हवामानाची स्थिती निवळल्याने त्याचप्रमाणे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा कमी झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये थंडी पुन्हा वाढली आहे. त्याचप्रमाणे येत्या तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुन्हा तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कोकण आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या आठवडय़ाच्या सुरुवातीला थंडी जवळपास गायब झाल्याचे चित्र होते. सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रवाह काहीसे कमी असले, तरी बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे बंद झाल्याने राज्याच्या काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊन थंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ९.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुणे, नाशिक, डहाणू, रत्नागिरी, सातारा, धुळे आदी भागातही थंडीत किंचित वाढ झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही प्रमाणात थंडी आहे. पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार सुरू राहणार आहे.

राजस्थान परिसरामध्ये सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्राच्या परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. त्याशिवाय मध्य प्रदेशच्या पूर्व भागात हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होऊ लागली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) १७.६, सांताक्रुझ १४.४, अलिबाग १५.५, रत्नागिरी १८.३, पुणे १०.२, नगर ९.६, जळगाव १२.४, कोल्हापूर १६.५, नाशिक ९.८, सांगली १४.०, सातारा १२.९, सोलापूर १६.६, उस्मानाबाद १०.४, औरंगाबाद १०.०, परभणी १४.८, नांदेड १८.०, बीड १४.८, अकोला १३.५, अमरावती १५.०, बुलडाणा १२.०, ब्रह्मपुरी १७.७, चंद्रपूर १७.६, गोंदिया १४.५, नागपूर १४.८, वाशिम १४.०, वर्धा १६.०, यवतमाळ १५.४.

First Published on February 9, 2019 3:17 am

Web Title: maharashtra gets the winter chills