राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यामध्ये ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्राकडून देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या संख्येवरुन राज्य सरकारला टोल लागावला आहे. राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी मलिक यांनी गुरुवारी केली. केंद्र सरकारने नुकतंच राज्यांना होणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन वाटपासंबंधी माहिती जाहीर केली आहे. यावरुनच आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु झाल्याचं चित्र दिसत आहे. याचसंदर्भात बोलताना आज चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राला गुजरात पेक्षा जास्त इंजेक्शन देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

“आतापर्यंत आम्हाला दिवसाला ३६ हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. नव्या वाटपानुसार, महाराष्ट्राला दिवसाला २६ हजार इंजेक्शन्स मिळणार आहेत. .यामुळे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यात मोठं संकट निर्माण होऊ शकतं,” अशी भीती नवाब मलिक यांनी गुरुवारी ट्विटरवरुन व्यक्त केली. याचसंदर्भात आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला असता चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारला दोष देत असल्याचं म्हटलं आहे. “ग्लास अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे असंही म्हणता येतं. आरोग्य मंत्र्यांनी आरोप केलाय की ३५ हजार इंजेक्शनच मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी सारखं केंद्राच्या अंगावर जायचं ठरवलं आहे. हे धक्कादायक आहे. केंद्राने जारी केलेली आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक इंजेक्शन महाराष्ट्राला मिळाली आहेत. २ लाख ६९ हजार १० आहेत. दिवसाला २६ हजार इंजेक्शन मिळाली आहेत. ज्या गुजरातच्या नावाने आरडाओरड होतोय त्यांना १ लाख ४० हजार मिळाली आहेत,” असं पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

इंजेक्शनचं वितरण करताना उपलब्ध असणारा साठ्याच्या आधारे वितरण केलं जातं, असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. “समजा पुण्यात १० हजारांचा साठा आहे. १५ हजारांची मागणी आली तर तातडीने गरज असणाऱ्यांनाच देणार लसी,” असं पाटील यांनी उदाहरणासहीत सांगितलं.