चार दिवसांत पुणे विभागांत मोठा महसूल प्राप्त; सवलतीमुळे दस्त नोंदणीत घसघशीत वाढ

पुणे : राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे दस्त नोंदणीत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार दिवसांत केवळ पुणे शहर व जिल्ह्य़ातून शासनाला तब्बल ११५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे पुण्यातील दस्त नोंदणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत करोना संकटातही वाढ झाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेली तीन टक्के  सवलत संपली असून शुक्रवारपासून (१ जानेवारी) मुद्रांक शुल्क एक टक्क्याने वाढले आहे.

राज्य सरकारने मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना देण्यासाठी ऑगस्ट महिन्यात मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के  मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले आहे, तर मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे महसुलात विशेष वाढ झालेली नाही. मात्र, मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना मिळण्याचा हेतू सफल झाला आहे.

दरम्यान, राज्यभरात पुण्यात सर्वाधिक दस्त नोंदणी होत असल्याचे निरीक्षण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून नोंदवण्यात आले आहे. त्यानुसार शहर व जिल्ह्य़ात चालू वर्षांत १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एक लाख ८१ हजार ५६१ दस्त नोंदवले गेले असून त्यापोटी शासनाला १२१४.४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर, १ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत ३२ हजार चार दस्त नोंद होऊन ४६५.३७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.

मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आल्याने दस्त नोंदणीमध्ये वाढ झाली आहे. मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना मिळण्याचा हेतू सफल झाला असून पुण्यात दस्त नोंदणीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. मार्च २०२१ पर्यंत असलेल्या सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही देशमुख यांनी सांगितले.

चार दिवसांतील दस्तनोंदणी आणि प्राप्त महसूल

दिनांक                दस्त नोंदणी             प्राप्त महसूल (कोटींमध्ये)

२८ डिसेंबर             १४९७                    २४.८७

२९ डिसेंबर             १६८१                    ३१.२२

३० डिसेंबर             १८७६                    २९.७८

३१ डिसेंबर             १८०० +                 २९.००+

एकूण                     ६८५४                     ११४.८७