मात्र पसंती ऑनलाइन योगाभ्यासालाच

पुणे : करोना रुग्णांची संख्या काहीशी नियंत्रणात आल्यानंतर आता योगाभ्यास वर्ग पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिक्षक आणि विद्यार्थीही ऑनलाइन योगाभ्यास करण्यालाच पसंती देत आहेत. शिवाय, करोनाचे संकट ओसरेपर्यंत प्रत्यक्ष योगासन वर्ग सुरू करणार नसल्याचे शिक्षक सांगत आहेत.

टाळेबंदीचे नियम शिथिल करत असताना टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरू करण्याची परवानगी प्रशासन देत आहे. त्याचाच भाग म्हणून नुकतेच योगासन वर्गही पूर्ववत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, योगासने करताना मुखपट्टीचा वापर शक्य नसल्यामुळे ऑनलाइन वर्गानाच प्राधान्य मिळत आहे.

योग प्रशिक्षक अभय जवखेडकर म्हणाले, परवानगी मिळाली तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे सध्या सुरक्षित वाटत नाही. कारण योगाभ्यासासाठी एकत्र आलेल्या व्यक्ती मुखपट्टी वापरू शकत नाहीत. शिकताना किं वा शिकवताना अनेक गोष्टींचा वापर के ला जातो. त्या हाताळल्यानंतर प्रत्येक वेळी त्याचे निर्जंतुकीकरण शक्य होत नाही. शिवाय, शारीरिक अंतराचे नियम पाळणे सद्य:स्थितीत आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही घरी राहून ऑनलाइन योगाभ्यास करणे जास्त सोयीचे ठरत आहे. अय्यंगार योगाभ्यासाचे विद्यार्थी जगभर पसरलेले आहेत. अनेक देशांमध्ये करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यामुळे सुरू झालेले योगाभ्यास वर्गही बंद करावे लागत आहेत, त्यामुळे सध्या प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात धोका वाटतो. म्हणून ऑनलाइन वर्गच सोयीचे ठरत आहेत, असेही जवखेडकर यांनी स्पष्ट के ले.

योग प्रशिक्षक स्वराली नेर्लेकर म्हणाल्या, करोना काळात सामूहिक गोष्टींवर बंदी घालण्यात आली, त्यामुळे योगासन वर्गही बंद झाले. त्यामुळे ऑनलाइन वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांसाठीही तो पर्याय सोयीचा ठरला. नुकतीच योगासन वर्गाना परवानगी मिळाली, तरी योगासने करताना मुखपट्टी वापरणे सोयीचे नसल्यामुळे वर्ग सुरू करणे जोखमीचे वाटते. विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन वर्गच हवे आहेत.