पुणे : सुधारित नागरिकत्व कायद्यासारख्या गोष्टींतून केंद्र सरकार देशात हिंदू आणि मुस्लीम यांच्यात ध्रुवीकरण करु पाहात आहे. दोन्ही धर्मात हिंसा भडकवण्याचा हा प्रयत्न हे देशाच्या अस्तित्वावरील संकट आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन स्वराज अभियानचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी सोमवारी केले.

कोंढवा येथील प्रतिशाहिनबाग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यादव पुण्यात आले होते. त्यावेळी ‘हम भारत के लोग’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. यादव म्हणाले, देशभरात फिरताना सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणी विरोधात नागरिक उत्स्फूर्तपणे भूमिका घेत आहेत. यात केवळ मुस्लीम नव्हे तर आदिवासी, वंचित, मागास समाजातील नागरिक देखील आहेत. त्यामुळे हे आंदोलन आता ‘भारत जोडो’ आंदोलन बनत आहे. ‘तुकडे तुकडे गँग’ म्हणून संबोधणारे पंतप्रधान आणि गृहमंत्रीच देश तोडायला निघाले आहेत.

२२ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान देशभरात ‘भारत जोडो’ अभियानाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ‘आम्ही भारताचे नागरिक’तर्फे सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीबाबत जनजागृती केली जाणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

या कायद्याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करण्यास आम्ही तयार असून गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा कोणताही संबंध नसल्याचे सरकार सांगत असले तरी ‘सिटिझन अ‍ॅक्ट २००३’ नुसार तो त्याचाच भाग असल्याचे स्पष्ट आहे. सरकारनेच देशाची धर्मशाळा केली असून गरज किंवा मागणी नसताना दुसऱ्या देशातील नागरिकांना देशाचे नागरिकत्व दिले जात आहे. भाजपचे नेते प्रसारमाध्यमांसमोर एक बोलतात आणि प्रत्यक्ष वेगळीच कृती करत असल्याचे दिसून येते, अशी टीकाही यादव यांनी केली.