बेघर गरीबांना महाराष्ट्र सरकार जमिनीचा पट्टा देणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. फक्त जमिनीचा पट्टाच नाही तर त्यावर घर बांधण्यासाठी पैसेही देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील एक कोटी व्यक्तींपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील 90 टक्के लोकांना आरोग्यावर कोणताही खर्च करण्याची गरज नाही. केंद्र आणि राज्य सरकार तो भार उचलणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या आरोग्य योजनेत देशातील पन्नास कोटी लोक कव्हर होत आहेत. त्याला राज्य सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनेची जोड दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. गरीबी हटावचा नारा देत अनेक निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. मात्र गरीब व्यक्ती गरीबच राहिला. निवडणुका आल्या की काँग्रेसला गरीबांची आठवण येते अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात केली. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसने देशावर घराणेशाही लादल्याचाही आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महापालिका ते केंद्रापर्यंत तुम्ही सत्ता भोगली तरी देखील प्रश्न राहीले आहेत. आता आमची सत्ता आली तर काही जण आम्हाला विचारतात की योजनांचे किंवा प्रकल्पाचे काय झाले? हा प्रश्न विरोधकांनी आम्हाला विचारू नये तो लोकांना विचारावा लोकच त्याचे योग्य उत्तर तुम्हाला देतील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, आमदार आणि नगरसेवक उपस्थित होते.