मनुष्यबळाचा मात्र मोठा अभाव; अ. भा. तंत्रशिक्षण परिषदेच्या अहवालातील निष्कर्ष

देशभरात २०१९ मध्ये उद्योग क्षेत्रातून नोकरी देण्याच्या सर्वाधिक शक्यता (हायरिंग अ‍ॅक्टिव्हिटी) महाराष्ट्रात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पात्र आणि कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात महाराष्ट्रच पिछाडीवर असल्याचा विरोधाभासही उघड झाला आहे. हा विरोधाभास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) अहवालातून समोर आला आहे.

एआयसीटीईचा ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट २०१९’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. २९ राज्ये, ७ केंद्रशासित प्रदेश, ३ हजारहून अधिक शिक्षण संस्था, साडेतीन लाखांहून अधिक तरुणांचा विविध निकषांनुसार कल जाणून घेऊन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

या अहवालातून शाखानिहाय रोजगारक्षम पदवीधरांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यात आला असून नोकऱ्या निर्माण करण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या राज्यांत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. त्यानंतर कर्नाटक आणि दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या स्थानी आहेत. तर रोजगारक्षम कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात आंध्र प्रदेश देशात आघाडीवर आहे. त्या खालोखाल दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या देशभरातील शहरांत राज्यातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांचा समावेश आहे. तर देशभरात सर्वात रोजगारक्षम पदवीधरांमध्ये अभियंत्यांचेच प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कुशल मनुष्यबळाची संख्या वाढवण्यासाठी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्याचे अहवालात सुचविले आहे. उद्योगांची सोबत घेऊन अभ्यासक्रमांची पुनर्रचना करणे, अध्ययन पद्धतीत बदल करणे, प्रशिक्षणावर आणि सुविधा निर्मितीवर भर देणे आवश्यक असल्याचेही अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. २०१५ पासून ‘हायरिंग इंटेट’मध्ये कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. २०१५ मध्ये हायरिंग इंटेट २३ टक्के होते. तर २०१९ मध्ये ते १५ टक्केच असल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०१९ मध्ये बँकिंग, वित्त सेवा आणि विमा, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, उत्पादन या तीन क्षेत्रांमध्ये सर्वाधिक रोजगारसंधी निर्माण झाल्या. तुलनेत रोजगारक्षम पदवीधरांचे प्रमाण वाढू लागले असले, तरी अद्याप ते ५० टक्क्य़ांवर गेलेले नाही. राष्ट्रीय पातळीवर केवळ ४७.५३ टक्के पदवीधर रोजगारक्षम असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये हेच प्रमाण ३४.९५ टक्के होते.

नोकऱ्या मिळालेल्या पदवीधरांचे शाखानिहाय प्रमाण

  •   अभियांत्रिकी इंजिनीअरिंग: २३ टक्के
  •   कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र : २२ टक्के
  • व्यवस्थापन पदवी, पदविका : १३ टक्के
  •   पदव्युत्तर  पदवी: ११ टक्के
  •   तंत्रनिकेतन : ७ टक्के
  •  आयटीआय : १२ टक्के
  •   पदवी शिक्षण पूर्ण नसलेले: १२ टक्के