दोनशे बेचाळीस रुग्ण दगावले

महाराष्ट्रातील स्वाईन फ्लू मागील काही वर्षांच्या तुलनेत नियंत्रणात आला असला तरी २०१९ या वर्षांतील देशातील स्वाईन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. १ डिसेंबर २०१९ पर्यंत ‘नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल’कडे राज्यात तब्बल दोनशे बेचाळीस रुग्ण स्वाईन फ्लूमुळे दगावल्याची नोंद झाली आहे.

‘नॅशनल सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल’ मधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार १ डिसेंबर २०१९ पर्यंत राज्यात दोन हजार दोनशे एकोणऐंशी रुग्णांना स्वाईन फ्लूचे निदान झाले. त्यांपैकी दोनशे बेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रानंतर राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे दोनशे आठ आणि एकशे पासष्ठ रुग्ण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, देशात स्वाईन फ्लूचे सर्वात काटेकोर सर्वेक्षण महाराष्ट्र राज्यात करण्यात येते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठय़ा असलेल्या काही राज्यांमध्ये स्वाईन फ्लू रुग्ण किंवा मृत्यू यांची नोंद ठेवली जात नाही. हवेतून पसरणारा आजार असल्याने जास्त लोकसंख्येच्या राज्यांनी स्वाईन फ्लूची नोंद योग्य पद्धतीने ठेवणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या सर्वाधिक दिसत आहे, मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, कारण मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील स्वाईन फ्लू नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. मागील वर्षी राज्यात चारशे एकसष्ट मृत्यू नोंदवण्यात आले होते. यंदा महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे सुमारे ऐंशी टक्के रुग्ण हे खासगी रुग्णालयांत आढळले आहेत. स्वाईन फ्लूची तपासणी केलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद राज्यात ठेवण्यात येते, त्यामुळे महाराष्ट्राची आकडेवारी अचूक दिसत आहे, मात्र त्याची तुलना इतर राज्यांशी करणे शक्य नाही.

पुण्यात स्वाईन फ्लू आटोक्यात

१ जानेवारी ते १ डिसेंबर २०१९ दरम्यान पुणे शहरात एकशे पंचाहत्तर रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली. यांपैकी एकशे बावीस रुग्णांना उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. शहरात वर्षभरात सुमारे दहा लाख दहा हजार चवेचाळीस रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. त्यापैकी सतरा हजार चारशे चार रुग्णांना टॅमिफ्लू देण्यात आले. एक हजार नऊशे अठ्ठय़ाण्णव रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले, त्यांपैकी एकशे पंचाहत्तर रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे दिसून आले.