News Flash

काका पवारांच्या तालमीतीले दोन मल्ल ‘महाराष्ट्र केसरी किताबा’साठी आमनेसामने

हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळकेमध्ये रंगणार अंतिम सामना

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरा तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या खुल्या गटाची अंतिम लढत सोमवारी मोठ्या चुरशीच्या वातावरणात पार पडली. गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके मंगळवारी महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात आमनेसामने उतरणार आहेत.

महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत अत्यंत चुरशीची झाली. लातूरचा शैलेश शेळके आणि सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात शेवटच्या सेकंदापर्यंत झुंज सुरु होती. मात्र शेवटच्या ४ सेकंदामध्ये शैलेशने बाजी मारत ज्ञानेश्वरला ११-१० अशा एका गुणाच्या फरकाने मात दिली. या विजयासह शैलेशने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

दुसरीकडे, नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी, पुणे शहराच्या अभिजीत कटकेला ५-२ गुणांनी पराजित केले. त्यामुळे ही लढत सोमवारच्या दिवसातील विशेष लक्षवेधी लढत ठरली. अभिजित कटके हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजला जात होता, मात्र हर्षवर्धनने क्षणात बाजी पलटत अभिजीतला पराभवाचं पाणी पाजलं. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या लढतीत काका पवारांचा कोणता शिष्य मानाची महाराष्ट्र केसरीची गदा हातात घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले काका पवार??

“दोन्हीही मल्ल माझ्याच तालमीत तयार झाले आहेत. दोघेही ग्रीको रोमन कुस्ती खेळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व जागतिक खेळाडू झाले आहेत. मात्र महाराष्ट्र केसरी कितबासाठी दोघेही प्रथमच खेळत आहेत. ते तगडे मल्ल आहेत याचा मला विश्वास होताच म्हणूनच दोघांनाही वेगवेगळ्या विभागातून मैदानात उतरविले. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना फळ मिळाले याचा मला आनंद आहे. दोघेही माझेच पठ्ठे असल्याने घरात गुण्यागोविंदाने राहायचे मात्र गादीवर प्रतिस्पर्धी म्हणूनच राहायचं हे मी त्यांना संगितलं आहे. विजयी कोणीही झाला तरी मला आनंदच असणार आहे. गेली कित्येक वर्ष आमच्या तालमीचे पैलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते. मात्र विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र महाराष्ट्र केसरी आमचाच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 8:51 pm

Web Title: maharashtra kesari 2 wrestlers from kaka pawar institute in pune reach prestigious maharashtra kesari competition final round psd 91
Next Stories
1 ICC Test Championship Points Table : टीम इंडियाचं अव्वल स्थान धोक्यात
2 महाराष्ट्र केसरी: गतविजेता बाला रफिक शेख पराभूत, अभिजित कटकेचे आव्हानही संपुष्टात
3 IND vs SL : दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी काय आहे हवामानाचा अंदाज? जाणून घ्या…
Just Now!
X