इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी, नंतर आयुष्य ऐषोआरामात आयुष्य…असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पुण्याच्या दौंड येथील समीर डोंबे या तरुणानेही आपलं इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करत पहिलं दीड वर्ष नोकरी केली. महिन्याकाठी ४० हजाराचा पगार मिळत असून नोकरीचं धकाधकीचं जीवन आणि त्यातून मिळणारा मोबदला यामुळे समीर फारसा समाधानी नव्हता. २०१३ साली समीरने नोकरी सोडत अंजिराची शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला परिवारातील एकही सदस्य किंवा मित्राने समीरच्या या निर्णयाला पाठींबा दिला नाही. तरीही समीरने जिद्दीने अजिंराची शेती करत वर्षाकाठी दीड कोटीची उलाढाल करेपर्यंतचा पल्ला गाठला आहे.

“आमच्या दौंड भागात सिंचनाची हवीतशी सोय नाही. परिसरातली संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मी शेतीमध्ये फारकाळ टिकू शकणार नाही असं सर्वांना वाटत होतं. माझं लग्न कसं होणार अशी चिंता आई-बाबांना होती.” समीर बेटर इंडिया या संकेतस्थळाशी बोलत होता. समीरने स्वतःच्या काही कल्पना अमलात आणत वेगळा बदल घडवून आणला. अडीच एकराच्या शेतजमिनीवर अंजिराचं उत्पन्न आल्यानंतर हातात आलेलं पिक बाजार समितीत नेण्याऐवजी समीरने १ किलोचे बॉक्स तयार करुन स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी द्यायला सुरुवात केली.

दौंड येथील समीरच्या शेतातलं अंजीर

 

छोट्या बॉक्समध्ये मिळणारं अंजीर पाहून समीरच्या एका मित्राने सुपरमार्केटमध्ये हे बॉक्स विक्रीसाठी ठेवण्याची कल्पना सुचवली. यानंतर एका स्थानिक सुपरमार्केटसोबत करार केल्यानंतर समीरला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. यानंतर समीरने आपल्या शेतातलं अंजिराचं पिक ‘पवित्रक’ या नावाने बाजारात आणलं. यानंतर पुणे, मुंबई, बंगळुरु, दिल्ली यासारख्या शहरांमधूनही समीरच्या शेतातील अजिंरांना मागणी वाढायला लागली.

आपल्या उत्पादनाचा वेगळा ब्रँड समीरने बाजारात आणला आहे

 

आपल्या बॉक्सवर उत्पादनाचं नाव, फोन नंबर आणि कंपनीचा पत्ता लिहीलेला असतो. त्यामुळे काही ग्राहक माझ्याशी थेट संपर्क साधून मागणी करायचे. मग काही ग्राहकांनी एक छोटासा ग्रुप तयार करत मोठ्या प्रमाणात अंजिराची ऑर्डर द्यायाला सुरुवात केली. याचाही आपल्याला फायदा झाल्याचं समीर म्हणाला.

दौंड येथील समीरचं अंजिराचं शेत

 

दौंड हे पुणेशहरापासून लांब असल्यामुळे या भागात प्रदूषणाचा फारसा त्रास नाही. अंजिराचं उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असलेली हवामानाची परिस्थिती, मातीचा पोत हे सर्वकाही अनुकूल होतं. या पट्ट्यात कोणीही अंजिराची शेती करत नसल्यामुळे याचा फायदा समीरने घेत आपलं उत्पादन बाजारत आणलं. या प्रयोगाला मिळालेलं यश पाहून समीरने आपली अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली असून उर्वरित जागेत तो अंजिरापासून जॅम आणि पल्प असे पदार्थ तयार करुन विकतो. ग्राहकांशी थेट संपर्क असल्यामुळे लॉकडाउनकाळातही समीरने थेट Whats App वरुन ऑर्डर स्विकारत खडतर काळात १३ लाखांचा धंदा केला. समीरच्या शेतातील उत्तम दर्जाच्या अंजिरांना आज बाजारात ८० ते १०० रुपये किलो असा भाव मिळतो. काहीतरी नवीन करायची जिद्द, समोर संकंट आली तरीही न घाबरता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या गुणामुळे आज समीर डोंबे या तरुणाने स्वतःला सिद्ध केलं आहे.