राज्यात सर्वात आधी करोनाचा रुग्ण सापडलेला पुणे जिल्हा सध्या वेगानं वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराचा वेळीच उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला होता. त्यामुळे करोना रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता आणखी एक घटना समोर आली असून, व्हेटिंलेटर बेडअभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिका नसल्यानं रुग्णांचा मृतदेह हातगाडीवर नेण्यात आला. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे.

पुण्यात करोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. शहरापासून २० किमी अंतरावर असलेल्या पानशेत रोड येथील खानपूर गावातील ४० वर्षीय व्यक्तीचा करोनानं मृत्यू झाला. खानपूरचे सरपंच निलेश जवळकर यांनी सांगितलं की ४० वर्षीय व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला.

चार दिवसांपूर्वी मयत व्यक्तीसह त्यांच्या भावालाही करोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर दोघेही नऱ्हे येथील खासगी रुग्णालयात गेले होते. मात्र, ग्रामस्थांच्या मदतीनं उभारण्यात आलेल्या रुग्णालयानं उपचारासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली. रुग्णालयानं श्वसनाचा त्रास होत असलेल्या रुग्णाला व्हेटिंलेटर बेड नसल्यानं दाखल करून घेण्यास नकार दिला.

जिल्हा परिषद कर्मचारी व स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रानं व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केले. पण, व्हेटिंलेटर बेडची व्यवस्था होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही भाऊ परत खानपूर येथील घरी परतले. उपचाराअभावी दोन्हीपैकी एका भावाचा करोनाचा संसर्ग वाढल्यानं मृत्यू झाला, अशी माहिती सरपंचानं दिली.

जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी वंदना गवळी यांनी सांगितलं की, ४० वर्षीय व्यक्ती जिल्हा परिषदेच्या स्वॅब केंद्रावर आली होती. ती करोना पॉझिटिव्ह निघाली होती. सदरील व्यक्तीची ऑक्सिजन पातळी ९० पेक्षाही कमी झाल्यानं ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,” असं त्या म्हणाल्या. व्हेटिंलेटर बेडची सुविधा असलेल्या रुग्णालयात हलवण्यात सांगण्यात आलं होतं. मात्र, रुग्ण घरी का गेला याबद्दल अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. मयत व्यक्तीच्या भावाला आता नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे.