News Flash

उरुळी देवाची येथे शहराचे धान्य गोदाम

शिवाजीनगर येथे मेट्रो मार्गिकांचे एकत्रीकरण आणि बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टीमोडल हब) होणार आहे.

हवेली गोदामाचे वडाची वाडी येथे स्थलांतर

पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) करण्यात येणाऱ्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड, तर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणारी हिंजवडी ते शिवाजीनगर अशा तिन्ही मेट्रो मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे येथील शहराचे धान्य गोदाम उरुळी देवाची, तर हवेलीचे वडाची वाडी येथे स्थलांतरित होणार आहे.

शिवाजीनगर येथे मेट्रो मार्गिकांचे एकत्रीकरण आणि बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टीमोडल हब) होणार आहे. त्यामुळे या ठिकाणचे शहराचे धान्य गोदाम तात्पुरते फुरसुंगी येथे खासगी जागेत हलवण्यात आले आहे. या जागेचा वापर साखर, तूरडाळ आणि कारवाईत जप्त केलेले दोन हजार मेट्रिक टनांपर्यंतचे धान्य ठेवण्यासाठी करण्यात येतो. या जागेचे भाडे महामेट्रोकडून देण्यात येत असून त्याची मुदत करारानुसार तीन वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथून धान्य गोदाम स्थलांतरित केल्यापासून तीन वर्षांच्या आत पुरवठा विभागाला शासकीय जागा मिळवणे गरजेचे होणार आहे.

या पार्श्वभूमीवर गोदामासाठी कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी उरुळी देवाची येथील पाच एकर सरकारी जागेची मागणी या विभागाकडून करण्यात आली होती. याबाबतचा अहवाल सध्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे असून अहवालात काही त्रुटी असल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

‘उरुळी देवाची येथे सरकारी गायरान जमीन आहे. या जागेचा काही भाग हवेली तालुक्यात, तर काही जागा पुणे महापालिकेच्या हद्दीत असून या जागेला सरकारची मंजुरी मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राम यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. शिवाजीनगर येथे शहर पुरवठा विभागाची १४ हेक्टर जागा होती. त्यामुळे या जागेच्या चालू बाजारभावाच्या किमतीनुसार उरुळी देवाची येथे विभागाला जागा मागण्याचा आमचा आग्रह आहे. उरुळी देवाची येथील जागेची मोजणी अद्याप झालेली नाही. तसेच प्रस्तावात काही त्रुटी आहेत. नव्या जागेत गोदाम स्थलांतरित झाल्यानंतर करारानुसार गोदाम महामेट्रोच बांधून देणार आहे’, अशी माहिती पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

दरम्यान, हवेलीचे धान्य गोदाम वडाची वाडी येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:19 am

Web Title: maharashtra metro rail corporation akp 94
Next Stories
1 कण्हेरी-काटेवाडीत दहशत निर्माण करणारा बिबटय़ा अखेर जेरबंद
2 पिंपरी प्राधिकरणाच्या उत्पन्नात घट
3 ‘मिळून साऱ्या जणी’त आता ‘ते’ही
Just Now!
X