विनायक करमरकर, लोकसत्ता

पुणे : गेल्या वेळी मतविभाजनामुळे पुणे मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. यंदा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने भाजपचा थेट लढतीत पराभव झाला. गेले अनेक वर्षे ताब्यात असलेला हा मतदारसंघ गमवावा लागल्याचे शल्य भाजपला अधिक असेल.

पुणे पदवीधरमध्ये भाजपने आतापर्यंत पक्षाच्या जुन्याजाणत्या नेत्यांना उमेदवारी दिली होती. भाजपमध्ये इच्छुकांची संख्याही मोठी होती; परंतु भाजपने काही वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या संग्राम देशमुख यांना रिंगणात उतरविले. त्याचा अपेक्षित फायदा पक्षाला झाला नाही. संग्राम देशमुख यांनी साम, दामचा उपयोग के ला; पण राष्ट्रवादीच्या आव्हानाशी सामना करू शकले नाहीत.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विजयी झाल्यामुळे त्यांच्यासाठी आणि भाजपसाठी  ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र भाजपचा हा बालेकिल्ला जिंकून घेण्यात महाविकास आघाडीला पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात दोन्ही उमेदवार सांगलीचे असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आघाडीवरही ही निवडणूक गाजत होती.

या निवडणुकीत ५७.९६ टक्के एवढे विक्रमी मतदान झाल्यामुळे निकालाबाबत मोठीच उत्सुकता होती. विविध पक्ष आणि अपक्ष असे ६२ उमेदवार निवडणूक लढवत होते. विजयासाठी १ लाख १३ पहिल्या पसंतीची मते आवश्यक होती. विशेष म्हणजे लाड यांना मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत १ लाख २२ हजार १४५ मते मिळाल्यामुळे ते या फेरीतच विजयी झाले. संग्रामसिंह देशमुख यांना पहिल्या पसंतीची ७३ हजार ३२१ मते मिळाली. त्यामुळे ४८ हजार ८२४ मतांची आघाडी घेत लाड विजयी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रूपाली पाटील यांना ६ हजार ७१३, तर जनता दल सेक्युलरचे माजी आमदार शरद पाटील यांना ४ हजार २५९ मते मिळाली.

ही निवडणूक जशी भाजपसाठी प्रतिष्ठेची होती, तशीच ती राष्ट्रवादीनेही प्रतिष्ठेची केली होती. केवळ निवडणूक प्रतिष्ठेची करून हा पक्ष किंवा महाविकास आघाडी थांबली नाही, तर मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची आवश्यक यंत्रणा उभी करण्यापासून ते बैठका, मेळावे, सभा अशा सर्व आघाडय़ांपर्यंत सुसूत्र यंत्रणा उभी करण्यात आघाडी यशस्वी झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व यंत्रणा सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन केल्याचे आणि ते यशस्वी ठरत असल्याचे सातत्याने दिसत होते. राष्ट्रवादीला काँग्रेस आणि शिवसेनेचीही चांगली साथ मिळाली. भाजपने मतदार नोंदणीपासूनच ही निवडणूक लढवण्यास सुरुवात केली होती. भाजपच्याही अनेक नेत्यांनी मेळावे, सभा घेऊन जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रवादीने प्रामुख्याने ग्रामीण मतदारांवर लक्ष केंद्रित केले आणि ही त्या पक्षाची व्यूहरचना चांगलीच यशस्वी ठरली.

भाजपमध्ये रुसवेफु गवे बघायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करूनही पक्षाचे अन्य नेते, अनेक लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीपासून चार हात दूरच राहिल्याचे दिसत होते. मुख्य म्हणजे सार्वत्रिक निवडणूक असल्यासारखा प्रचार, हस्तपत्रकांचे वाटप अशी भाजपची कार्यपद्धती दिसली.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीमुळे भाजपचे चंद्रकांत पाटील यांचे फावले होते. या वेळीही तिरंगी सामना व्हावा, असा भाजपचा प्रयत्न होता; परंतु दुरंगी लढतीत भाजपची पीछेहाट झाली.  पुणे पदवीधरनंतर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे लक्ष्य हे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे आहे. कोल्हापूर महापालिके ची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. मतविभाजन टाळण्याकरिता महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवावी, ही भावना तिन्ही पक्षांमध्ये बळावत चालल्याचे निकालानंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रि यांवरून दिसते.

पुणे पदवीधर मतदारसंघ

* अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) – १ लाख २२ हजार

* संग्राम देशमुख (भाजप) – ७३,३२१

अरुण लाड  ४८,८२४ मतांनी विजयी