Maharashtra SSC 10th Result 2018: मूळची यवतमाळची पण सध्या पुण्यात काम करणाऱ्या वैष्णवी भोरेचा २०१० साली अपघात झाला आणि ती परीक्षेला मुकली. यानंतर वैष्णवीने शिक्षण सोडून नोकरीसाठी पुण्यात धाव घेतली. पण शिक्षणाअभावी पगार वाढणार नाही हे तिच्या लक्षात आले. वैष्णवीने जिद्दीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि तिच्या या प्रयत्नांना यश आले असून शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात वैष्णवीला ५६ टक्के मिळाले आहेत. पुण्यातील रात्र शाळांमधील मुलींमध्ये ती पहिली आली असून तिच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातील चार रात्र शाळांपैकी पूना नाईट हायस्कूलमधील वैष्णवी भोरे ही विद्यार्थिनी मुलींमध्ये ५६ टक्के मिळवत प्रथम आली आहे. वैष्णवी पुन्हा शिक्षणाकडे का वळली याचे कारणही सांगते. ती म्हणाली, मी मूळची यवतमाळ येथील असून २०१० मध्ये दहावीमध्ये गेल्यावर माझा अपघात झाला. त्यामुळे मला पुढील शिक्षण घेणे अशक्य झाले. शेवटी मी पुण्यात मावशीकडे कामानिमित्त आले. २०१५ मध्ये एका खासगी संस्थेत नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले आणि एरंडवणा येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला लागले. तिथे पगार चांगला आहे. मात्र पदवी नसल्याने त्यामध्ये वाढ होत नाही. शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने मी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दहावीची परीक्षा देताना हॉस्पिटलमधील कामाचे नियोजन केल्याने दहावीमध्ये पास होता आले. आता यापुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन नर्सिंगची डिग्री घेणार आहे. तसेच रुग्णाची सेवा करणार असल्याचे तिने सांगितले.