04 March 2021

News Flash

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षकांना चारचाकी!

शिरूरजवळच्या पिंपळे खालसा ग्रामस्थांची अनोखी गुरूदक्षिणा

वर्गशिक्षिका ललिता धुमाळ आणि विद्यार्थी

प्रतिनिधी, पुणे

शिक्षकांच्या मेहनतीला ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली, तर जिल्हा परिषदेच्या शाळेतही गुणवत्तेची किमया घडू शकते, याचे उदाहरण शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या रुपाने समोर आले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतील पाचवीच्या १९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून, ग्रामस्थांनी गुरुदक्षिणा म्हणून वर्गशिक्षिका ललिता धुमाळ यांना चारचाकी भेट दिली आहे.

आपल्या गावातील शाळेतून गुणवान विद्यार्थी घडावेत या विचारातून ग्रामस्थांनी शिक्षकांच्या मदतीने पुढाकार घेतला. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, तर ग्रामस्थांकडून वर्गशिक्षकाला चारचाकी भेट देण्याची पद्धत २०११ पासून सुरू झाली. आतापर्यंत पाच शिक्षकांना भेटरूपात चारचाकी मिळाली आहे. यंदा ललिता धुमाळ गुरुदक्षिणा म्हणून ग्रामस्थांनी दिलेल्या चारचाकीच्या मानकरी ठरल्या. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेच्या नियमित वेळेशिवाय शिक्षक अतिरिक्त वर्ग घेतात. विशेष म्हणजे, विद्यार्थीही उत्साहाने त्यात सहभागी होतात. त्याचाच परिणाम म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरू लागले आहेत. गेल्या वर्षी या शाळेतील २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली होती. यंदा १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

‘शिष्यवृत्ती परीक्षेची आम्ही तिसरी-चौथीपासूनच तयारी करून घेतो. विद्यार्थ्यांना इतर स्पर्धा परीक्षांनाही बसवतो. पाचवीत जूनपासूनच शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू होतात. सकाळी आठ ते सायंकाळी सहा आणि दिवाळीनंतर सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत शिष्यवृत्तीचे मार्गदर्शन केले जाते. या दरम्यान नियमित अभ्यासक्रमही पूर्ण केला जातो. विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. त्यामुळे त्यांची चांगली तयारी होते,’ असे धुमाळ यांनी सांगितले.

ग्रामस्थांबरोबर केल्या जाणाऱ्या सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेची पटसंख्याही वाढली आहे. आता पहिली ते सातवीत जवळपास ३५० हून अधिक विद्यार्थी आहेत.

शाळेचा कायापालट

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट केला. ग्रामस्थांनी सुमारे १ कोटी रुपये खर्च करून शाळेची दोन मजली इमारत बांधली. तसेच विद्यार्थ्यांना चांगले इंग्रजी यावे म्हणून शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. या सगळ्याचा परिणाम आता गुणवंत विद्यार्थ्यांच्या रूपाने दिसून येऊ लागला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 12:59 pm

Web Title: maharashtra pimple khalsa villagers gift teacher a car after students ace scholarship exam
Next Stories
1 पुण्यात मौलवीकडून १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार
2 रिक्षेची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा
3 शाळांना सीसीटीव्ही सक्ती!
Just Now!
X