प्रक्रिया केली जाणार असल्याचा प्रशासनाचा दावा; रस्त्यासाठीही उपयोग होणार

प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यामुळे महापालिका प्रशासनाकडे जप्त केलेले प्लास्टिक मोठय़ा प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. या जप्त प्लास्टिकचे बारीक बारीक तुकडे करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी जप्त प्लास्टिकचे प्रमाण पाहता प्लास्टिकचे करायचे काय, असाच प्रश्न प्रशासनापुढे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाने घेतला. प्लास्टिकचा वापर, विक्री आणि उत्पादनावर राज्य शासनाने या निर्णयानुसार बंदी घातली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शनिवारपासून (२३ जून) सुरू झाली आहे. प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत असून कारवाईचा धडाका घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि भरारी पथकाकडून सुरू झाला आहे.

शनिवारी आणि सोमवारी महापालिका प्रशासनाकडून पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यामातून प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. शनिवारी तब्बल आठ हजार किलो तर सोमवारी सात हजार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

या दोन दिवसांमध्येच पंधरा हजार किलो प्लास्टिक प्रशासनाकडे जमा झाले आहे. यात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मोठय़ा संख्यने प्लास्टिक जप्त होणार, हे स्पष्ट आहे.

या दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वीपासून प्रशासनाकडून प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी प्रभागनिहाय संकलन केंद्रेही उभारण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत नागरिकांनी दोन महिन्यांमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टन प्लास्टिक जमा केले आहे. जमा झालेल्या आणि जप्त होत असलेल्या प्लास्टिकचे प्रमाण पहाता येत्या काही दिवसांत या प्लास्टिकचे करायचे काय, असाच प्रश्न निर्माण होणार आहे.

प्लास्टिक बंदीचा आदेश येण्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कारवाई करण्यात येत होती. त्यामुळे प्लास्टिक पूर्वीपासूनच प्रशासनाकडे संकलित होत होते. पण त्याचे प्रमाण फार मोठे नव्हते.

या जमा झालेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत होता. आता घर आणि दुकानातील प्लास्टिकही जप्त होत आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जमा होणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करता येणार का, तेवढी यंत्रणा महापालिकेकडे आहे का, हा मुद्दाही त्यामुळे उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर प्लास्टिकचा वापर करून रस्ते तयार करावेत, असे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे.

महापालिकेने प्लास्टिकच्या वापरातून शहरात काही ठिकाणी रस्तेही बनविले आहेत. मात्र दहा टक्क्य़ांपेक्षा अधिक प्रमाणात प्लास्टिकचा वापर करता येत नाही. त्यामुळे प्लास्टिक वापरालाही मर्यादा आल्या आहेत. जमा झालेल्या प्लास्टिकचा वापर करून रस्ते करण्यासंदर्भात घनकचरा व्यवस्थान विभाग आणि पथ विभाग यांच्यात चर्चा झाली आहे. पण प्लास्टिक वापराच्या मर्यादेमुळे काही प्लास्टिक तसेच पडून राहण्याची शक्यता आहे.

‘विल्हेवाटीत अडचण येणार नाही’

जमा आणि जप्त झालेल्या प्लास्टिकची विल्हेवाट लावता न आल्यास भविष्यात त्याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता आहे. हे प्लास्टिक म्हणजे कचराच ठरणार असून कचऱ्याचा प्रश्नही त्यामुळे गंभीर होण्याची चिन्हे आहेत. मात्र प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा सध्या प्रशासनाकडून केला जात आहे.