पत्रावळी आणि प्लास्टिकमुक्तीचा संकल्प; भोजनासाठी स्टीलच्या ताटांचा वापर

राज्य शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या पाश्र्वभूमीवर यंदाची आषाढी वारी पत्रावळी आणि प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या भोजनासाठी स्टीलची ताटे वापरण्यात येणार आहेत. आतापर्यंत २० हजार ताटांचे संकलन करण्यात आले असून वारकऱ्यांनी आपल्यासमवेत स्टीलचे ताट आणावे या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी ही माहिती दिली. स्टीलच्या ताटांचा वापर केल्यामुळे पत्रावळी, प्लास्टिक आणि थर्माकोलच्या थाळ्यांचा वापर थांबेल. कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचेही पालन होईल. वारीच्या पद्धतीनुसार स्टीलची ताटे धुण्यासाठी फारसे पाणी लागत नाही. त्यामुळे पाण्याची बचत होऊन स्वच्छता राखण्यास मदत होणार आहे, असेही चोपदार यांनी सांगितले.

चोपदार म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सिद्धिविनायक ट्रस्ट या संस्थांनी कचरा संकलित करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्लास्टिक पिशव्या  पुरवल्या. आमच्या कार्यकर्त्यांनी त्या सर्व दिंडीत पोहोचवल्या. चोपदारांनी सांगितलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत वारकऱ्यांनी शिल्लक अन्न, पत्रावळ्या पिशवीत भरून ठेवत स्वच्छता अभियान यशस्वी करण्यास हातभार लावला. राज्य शासनाने प्लास्टिक बंदी शासनाने केल्यामुळे यंदा ‘आम्ही वारकरी’ संस्थेच्या माध्यमातून पत्रावळीमुक्त वारीचा संकल्प करण्यात आला आहे. यंदा स्टीलच्या ताटांचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत ४५ दिंडय़ांनी स्वत:ची ताटे खरेदी करून पत्रावळी व द्रोण न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेकडे २० हजार ताटांचे संकलन झाले असून वारी सुरू होईपर्यंत ही संख्या ५० हजार होईल.

४० लाख पत्रावळ्यांची बचत

वारी पत्रावळीमुक्त करण्यासाठी ५० हजार ताटे संकलित झाली, तर एका ताटाचा दोन पंगतींसाठी वापर केल्याने एक लाख वारकरी भोजन करू शकतील. दिवसाला दोन लाख वारकरी या ताटांचा वापर करुन भोजन करतील. त्यामुळे ४० लाख पत्रावळ्यांची बचत होऊ शकेल, असे रामभाऊ चोपदार यांनी सांगितले.