महाराष्ट्र पोलीस दलात कारवाईसाठी ९३ ‘विशेष वाहने’

राहुल खळदकर, पुणे</strong>

राज्यातील अपघातांचे वाढते प्रमाण, वाढते अपघाती मृत्यू तसेच वाहनचालकांची बेशिस्त लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाकडून ९३ ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ खरेदी केली जाणार आहेत. लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन, इ-चलन यंत्रणा, मद्यपींवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर यंत्रणा आदी सुविधा असलेली ही अत्याधुनिक वाहने पोलीस दलात येत्या काही दिवसांत दाखल होणार आहेत.

महाराष्ट्रात अपघाती मृत्यूंचे प्रमाण मोठे आहे. अपघातांमागे वाहनचालकांची बेशिस्त हे प्रमुख कारण ठरते. महामार्गावर वेगमर्यादा धुडकावून वाहने चालविली जातात. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अनेक वाहनचालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाच्या अपघातांना निमंत्रण मिळते. महामार्गावरील बेशिस्तीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने ९३ इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडला असून येत्या चार ते पाच महिन्यांत ही वाहने महाराष्ट्र पोलीस दलात दाखल होतील, अशी माहिती मुंबईतील महामार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) विजय पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

दिल्ली पोलीस दलात इंटरसेप्टर व्हेईकल आहेत. महामार्गावर तसेच शहरात कारवाई करण्यासाठी अशा प्रकारची वाहने उपयुक्त ठरतील हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी इंटरसेप्टर वाहने खरेदी करण्यासाठी चाचपणी सुरू केली होती. महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्य़ांत असलेली पोलीस आयुक्तालये तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात प्रत्येकी दोन ते तीन इंटरसेप्टर व्हेईकल देण्याचा प्रस्ताव असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर ‘एक राज्य एक चलन’ या योजनेअंतर्गत राज्यातील एखाद्या शहरात नियमभंग केल्यास दुसऱ्या शहरात दंडाची रक्कम आकारणे शक्य होणार आहे. या वाहनात इ-चलन यंत्रणा असून महामार्गावर दंडात्मक कारवाई प्रभावीपणे करणे शक्य होईल. इ-चलन यंत्राच्या माध्यमातून अपघातस्थळाचे तसेच बेशिस्त वाहनचालकाचे छायाचित्र नियंत्रण कक्षाला पाठविणे शक्य होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी दिली.

या वाहनांमध्ये काय?

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग किंवा राज्यातील अन्य महामार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीडगनने कारवाई करण्यात येते. ‘इंटरसेप्टर व्हेईकल’मध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून पोलिसांकडून स्पीडगन कारवाई करण्यात येत होती. या नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. त्यामुळे उन-वारा, पावसाचा परिणाम पोलिसांच्या स्पीडगन कारवाईवर होणार नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आवश्यक

राज्यातील सर्वाधिक वेगवान वाहतुकीचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर इंटरसेप्टर व्हेईकल तैनात करण्यात येणार आहेत. महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्य़ांतील ग्रामीण पोलिसांना गरज भासल्यास अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.