शिवसेनेचे सोलापूरमधील नेते महेश कोठे यांच्या नावाची राज्यात विशेष चर्चा सुरू आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महेश कोठे यांच्या पक्षप्रवेशाविषयी डिलीट केलेल्या ट्विटमुळे तर त्यातील ट्विस्ट आणखी वाढला आहे. महेश कोठे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याचं शरद पवार यांनी ट्विट करून म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर ते ट्विट डिलीट करण्यात आलं. त्यामुळे महेश कोठे सध्या कोणत्या पक्षात आहेत? यावरूनच जोरात चर्चा सुरू आहे. कोठे यांच्याविषयी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शरद पवार यांचं ट्विट आणि महेश कोठे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले,”महेश कोठे हे मागील सहा ते आठ महिन्यांपासून अस्वस्थ आहेत. काहीतरी वेगळी राजकीय भूमिका घ्यावी, असं त्यांच्या मनात सुरू आहे. त्यांच्याबद्दल बातम्यामधूनच वाचले आहे. आमचं महाविकास आघाडीमध्ये मागेच ठरलं आहे की, आपलं तीन पक्षाचं सरकार चालवत असताना आणि आपल्याला इतर मित्र पक्षाचा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकमेकांच्या पक्षाची फोडाफोडी करू नये, असं साधारण ठरलेलं आहे. आम्ही मागील १५ वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आणि आमच्या पक्षातून काँग्रेसमध्ये नेते जात-येत होते. त्यामुळे आम्ही भाऊभाऊच काम करीत असल्याने तेव्हा विशेष काही अडचण निर्माण झाली नव्हती. पण यावेळी मात्र सुरुवातीच्या काळात सरकार आल्यानंतर आपण काही बंधने पाळावित, अशी चर्चा झालेली आहे,” असं म्हणत अजित पवार यांनी महेश कोठे यांच्याबद्दलच्या मूळ प्रश्नाला बगल दिली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली होती. त्यानंतर अचानक महेश कोठे यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याचं ट्विट शरद पवारांनी केलं. त्यानंतर काही वेळात हे ट्विट डिलीट करण्यात आल्यानं राजकीय गोंधळ निर्माण झालेला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 7:27 pm