पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात आज (दि.२) कोविडची ‘ड्राय रन’ पार पडली. शहरातील चिंचवड आणि मान येथील रुग्णालयातही ड्राय रन पार पडली आहे. तिन्ही रुग्णालयात नोंदणीकृत 75 आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही ड्राय रन करण्यात आली. मात्र अद्याप कोणत्याही व्यक्तीला कोविडची लस दिली गेलेली नाही.
सिरम इन्स्टिट्युटच्या कोविड लसीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कोविड ड्राय रन घेण्यात आली. त्यात, पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवड शहरातील जिजामाता रुग्णालय आणि मान येथील ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान ही ड्राय रन पार पडली. ज्या कर्मचाऱ्यांवर ड्राय रन घेतली गेली त्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच करोना लसीकरणासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर नोंदणी केलेली होती. त्यांची मुलाखत घेण्यात आली, नंतर लसीकरण असलेल्या ठिकाणी बसवून त्यांची विचारपूस करत यात काय अडचणी येतात याविषयी आढावा घेण्यात आला आहे.
दरम्यान, लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवले जाते. ही सर्व प्रक्रिया आज केवळ ड्राय रन म्हणून पार पडली आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणालाही लस देण्यात आलेली नाही. तिन्ही केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 2, 2021 1:37 pm