पुणे : भारताला नैर्ऋृत्य मोसमी पावसाची देणगी लाभली असल्याने हंगामात तो कमी-अधिक प्रमाणात बरसतोच. पण, बदलत्या चक्रामध्ये हवामान अधिकच लहरी होत असल्याचा अनुभव यंदाही आला. पूर्वमोसमी, मोसमी आणि अवकाळी मिळून सरलेल्या पूर्ण वर्षांत राज्यात कोणत्या ना कोणत्या विभागात बारमाही पाऊस पडला. सुरुवातीचे सलग पाच महिने गारपिटीने दाणादाण उडवून दिली. २०२१ या नव्या वर्षांतील पहिल्या महिन्यातही सरी कोसळल्याने राज्यात पावसाचा हा सलग तेरावा महिना ठरला आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे यामुळे देशातील इतर राज्यांसह महाराष्ट्रातही मोठय़ा प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, तर हातातोंडाशी आलेल्या शेतीचेही अतोनात नुकसान झाले. २०२० मध्ये जानेवारीच्या सुरुवातीलाच ऐन थंडीत विदर्भात गारपिटीने पिकांची दाणादाण उडवून दिली, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही जोरदार पावसाने शेतीचे नुकसान केले.

फेब्रुवारीच्या शेवटच्या टप्प्यातही पुन्हा मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात गारपीट आणि धुवाधार पाऊस होऊन शेतीचे नुकसान झाले. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ात मराठवाडा, विदर्भाने पुन्हा गारपीट सोसली. २५ मार्चला मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना वादळी पावसाने झोडपून काढले.

एप्रिल महिन्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीनंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत असतानाच अवकाळी पावसाने त्यात भर घातली. १८ एप्रिलला राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. काही भागांत वादळी पाऊस आणि गारपीट होऊन  शेतीमाल, फळबागांचे नुकसान झाले. कोकणामध्ये आंब्यालाही पावसाने तडाखा दिला. मे महिन्यातील १३ तारखेला पूर्वमोसमीचा पहिला मोठा तडाखा राज्याला बसला. मोसमी पाऊस राज्यात दाखल होण्यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे ३ जूनला राज्यभर मुसळधार पाऊस झाला.

जूनच्या ११ तारखेला राज्यात मोसमी पावसाचा प्रवेश झाला आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबपर्यंत कमी अधिक प्रमाणात बरसला. ऑगस्टच्या मध्यावर अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. हंगाम संपला, पण पाऊस ऑक्टोबपर्यंत लांबला. १४ ऑक्टोबरला त्याने राज्यभर धुमाकूळ घालीत जनजीवन विस्कळीत केले. २८ ऑक्टोबरला मोसमी पाऊस माघारी फिरला. नोव्हेंबरच्या शेवटी थंडीत पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली. डिसेंबरमध्येही १४ तारखेनंतर चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पाऊस होता. आता नव्या वर्षांतील पहिल्या आठवडय़ातही राज्यात पाऊस कोसळला.

चक्रीवादळांची मालिका..

’ सरलेल्या २०२० मध्ये समुद्रांत चक्रीवादळांची मालिकाच निर्माण झाली होती. त्यातील पाच चक्रीवादळांचे महाचक्रीवादळात रूपांतर झाले.

’ अम्फन, निवार, गती, निसर्ग आणि बुरेवी या चक्रीवादळांनी धुमाकूळ घातला. निसर्ग आणि गती हे अरबी समुद्रात, तर इतर तीन चक्रीवादळे बंगालच्या उपसागरात तयार झाली होती.

’ निसर्ग चक्रीवादळाने प्रामुख्याने महाराष्ट्रात हाहाकार उडवून दिला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात त्याने प्रचंड नुकसान केले.