आगामी साहित्य संमेलनासाठी आलेल्या ११ निमंत्रणांपैकी नेमक्या कोणत्या स्थळांना भेट द्यायची याबाबतचा निर्णय आता जुलैमध्येच होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य या परेदशी गेल्यामुळे साहित्य महामंडळाने महिनाभरासाठी विश्रांती घेतली आहे.
घुमान येथील साहित्य संमेलनानंतर साहित्य महामंडळाला आगामी ८९ व्या संमेलनाचे वेध लागले आहेत. त्या संदर्भात १७ मे रोजी महामंडळाची बैठक झाली होती. यामध्ये घुमान संमेलनाच्या यशस्वीतेची कहाणी सांगण्याबरोबरच महामंडळाच्या सदस्यांना आगामी संमेलनासाठी विविध ठिकाणहून आलेल्या ११ निमंत्रणांची माहिती देण्यात आली होती. मात्र, या बैठकीमध्ये सदस्यांनीच महामंडळाच्या कार्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे केवळ मार्गदर्शन समितीची निवड करून हा विषय त्या वेळी संपविण्यात आला होता.
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा एक महिनाभराच्या कालावधीसाठी परदेशी रवाना झाल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रमुख आणि महामंडळाच्या माजी अध्यक्षा प्रा. उषा तांबे या देखील अमेरिकेला गेल्या आहेत. एक महिनाभर तरी संमेलन स्थळाबाबत कोणताही निर्णय होणार नसल्याने साहित्य महामंडळाने विश्रांती घेतली असल्याचेच चित्र समोर आले आहे. मात्र, पायगुडे यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. आगामी संमेलनासाठी आलेल्या ११ निमंत्रणांपैकी नेमक्या कोणत्या स्थळांना भेट द्यायची याबाबतचा निर्णय २ जुलै रोजी होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 अनुदानासाठी होणार लवकर निर्णय
साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या २५ लाख रुपयांच्या अनुदानाचा धनादेश हा कोणत्याही परिस्थितीमध्ये विजया दशमीला साहित्य महामंडळाच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी घुमान साहित्य संमेलनामध्ये केली होती. यंदा अधिकमास आल्यामुळे विजया दशमी म्हणजेच दसरा हा एक महिना उशिरा म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या २ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये संमेलन स्थळांना भेटी देण्याबाबतचा निर्णय घेऊन विजया दशमीपूर्वी संमेलन स्थळ निश्चित करावे लागणार आहे, याकडेही या सूत्रांनी लक्ष वेधले.