राजकारण हे अतिशय बदनाम क्षेत्र बनले आहे आणि ते काम राजकीय मंडळींनीच केले आहे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी चिंचवड येथे केली. महाराष्ट्राची किंमत बाहेर गेल्यानंतर कळते, अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.
नाटय़ परिषदेच्या पिंपरी शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांना जाजू यांच्या हस्ते गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. खासदार अमर साबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, भाजपचे शहराध्यक्ष सदाशिव खाडे, परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते. अभिनेते जनार्दन लवांगरे, संदीप पाठक, स्मिता तांबे, प्रमोद पवार, रवींद्र घांगुर्डे, प्रवीण कुलकर्णी, सायली सांभारे, मधू ओझा, विवेक भालेराव, नीता पाटील, प्रशांत बरिदे यांना गौरवण्यात आले.
जाजू म्हणाले, राजकीय मंडळींनी राजकारणाला बदनाम करून सोडले. राजकारण्यांना घरातच एकप्रकारे शिक्षा भोगावी लागते. पूर्ण वेळ राजकारणात असूनही मुलांच्या कागदपत्रांवर व्यवसाय म्हणून सामाजिक कार्य लिहिण्याची वेळ येते. राजकारण्यांना फारसे कार्यक्रमांना बोलावले जात नाही. काही माणसे चांगली असतात, ती चुकून राजकारणात येतात. देश मागे आहे, मात्र महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा, कला, नाटय़, गीत पुढे आहे. संतांचा, सामाजिक सुधारकांचा, क्रांतिकारकांचा वारसा असलेल्या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा आहे. संस्था सुरू होतात, बंदही पडतात. मात्र, नाटय़ परिषदेसारख्या विविध उपक्रम राबवणाऱ्या संस्था कामातून लक्ष वेधून घेतात. प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर, सूत्रसंचालन नाना शिवले यांनी केले. राजेशकुमार सांकला यांनी आभार मानले.