23 March 2019

News Flash

विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणीपेक्षा पुनर्मूल्यांकन फलदायी!

राज्यमंडळाच्या गेल्या तीन वर्षांच्या अहवालातील कल

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| चिन्मय पाटणकर

राज्यमंडळाच्या गेल्या तीन वर्षांच्या अहवालातील कल

इयत्ता दहावीच्या निकालानंतर केल्या जाणाऱ्या उत्तरपत्रिकांच्या गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांत गुणपडताळणीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणांत फार फरक पडलेला नाही. मात्र, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या सुमारे ७० टक्केहून अधिक विद्यार्थ्यांचे गुण बदलत असल्याचा कल दिसून आला आहे.

राज्य मंडळाच्या गेल्या तीन वर्षांतील अहवालातील हा निष्कर्ष आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या निकालाबाबत काही शंका, आक्षेप असल्यास उत्तरपत्रिकेची छायाप्रत, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन करता येते. त्यासाठी शुल्क भरून अर्ज करावा लागतो. छायाप्रतींसाठी  २०१५ मध्ये ८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी, २०१६ मध्ये १३ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी आणि २०१७ मध्ये १० हजार ५१० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.

गुणपडताळणीसाठी २०१५ मध्ये २४०८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील २३ विद्यार्थ्यांच्या निकालात आणि ८९ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला. २०१६ मध्ये २४३० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील १३ विद्यार्थ्यांच्या निकालात आणि ११९ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला. २०१७ मध्ये १६८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांच्या निकालात आणि १०३ विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल झाला, तर पुनर्मूल्यांकनामध्ये २०१५ मध्ये १४२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यातील १०३७ विद्यार्थ्यांच्या गुणांत आणि निकालात बदल झाला. २०१६ मध्ये २३८४ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. त्यात १७८६ विद्यार्थ्यांच्या गुणांत आणि निकालात बदल झाला. २०१७ मध्ये अर्ज केलेल्या १९१७ विद्यार्थ्यांपैकी १४३९ विद्यार्थ्यांच्या गुणांत आणि निकालात बदल झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहिल्यास गुणपडताळणीमध्ये गुण किंवा निकाल बदलणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. मात्र, पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या ७० टक्केहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल बदलले असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

छायाप्रत, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू

सध्या छायाप्रत, गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची ९ ते १८ जून आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज करण्यासाठी ९ ते २८ जून मुदत आहे. तसेच उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आधी विद्यार्थ्यांनी छायाप्रत घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल.

पुनर्मूल्यांकनाची टक्केवारी एकूण विद्यार्थ्यांवरून का?

पुनर्मूल्यांकनामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात, त्यांची टक्केवारी आलेल्या अर्जाच्या तुलनेत न मोजता परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये का मोजली जाते हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, २०१७ मध्ये १९१७ विद्यार्थ्यांनी पूनर्मूल्यांकन केले. त्यात १४३९ विद्यार्थ्यांचे गुण किंवा निकाल बदलले. गुण किंवा निकालात बदल झाल्याची टक्केवारी राज्यमंडळाने ०.०९ नमूद केली आहे. प्रत्यक्षात आलेल्या अर्जाच्या तुलनेचा विचार केल्यास ही टक्केवारी ७५ टक्के होते. मात्र, राज्यमंडळाने परीक्षा दिलेल्या एकूण १६ लाख ४४ हजार १६ विद्यार्थ्यांच्या प्रमाणात टक्केवारी काढण्यात आली आहे.

गुणपडताळणीमध्ये गुणांच्या उभ्या आडव्या बेरजा तपासल्या जातात, देण्यात आलेले गुण मोजले आहेत की नाही, हे पाहिले जाते. तर, पुनर्मूल्यांकनामध्ये पूर्ण उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते. गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन या दोन्ही प्रक्रिया वेगळ्या आहेत.    – डॉ. शकुंतला काळे, अध्यक्षा, राज्य मंडळ

First Published on June 13, 2018 1:36 am

Web Title: maharashtra ssc 10th result 2018 3