चाकणच्या गणेश हाकेने ७६.४० टक्के गुण मिळवले

परीक्षेदरम्यान झालेला अपघात.. तरीही परीक्षा देण्याची तीव्र इच्छाशक्ती.. राज्य मंडळाकडून रुग्णालयातून परीक्षा देण्याची मिळालेली विशेष परवानगी.. चांगले गुण मिळाल्याने वर्ष वाया न गेल्याचा आनंद.. चाकणच्या गणेश हाकेची थरारक म्हणावी अशीच कथा! शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालात गणेशला ७६.४० टक्के गुण मिळाले. आता त्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.

चाकणच्या भामचंद्र माध्यमिक विद्यालयात शिकणारा गणेश हाके १९ मार्च रोजी परीक्षा देऊन घरी परत येत असताना रस्ता ओलांडताना त्याचा अपघात झाला. त्यात त्याच्या पायाला दुखापत झाली. पिंपरीच्या स्वामी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे वर्ष वाया जाण्याची खंत गणेशच्या मनात होती. मात्र, त्याला काहीही करून वर्ष वाया जाऊ  द्यायचे नव्हते. अखेर, त्याच्या वडिलांनी राज्य मंडळाला या प्रकाराची कल्पना दिली. विशेष म्हणजे, राज्य मंडळानेही गणेशवर ओढावलेली परिस्थिती लक्षात घेत त्याला रुग्णालयातून परीक्षा देण्यास परवानगी दिली. राज्य मंडळातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेशने २१ मार्चला माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि २३ मार्च रोजी भूगोलाची प्रश्नपत्रिका रुग्णालयातून सोडवली. रुग्णालयातून दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे उदाहरण गणेशच्या रूपाने पहायला मिळाले.

गणेशचे वडील ज्ञानोबा हाके यांनी या विषयी माहिती दिली. ‘अपघातानंतर लगेचच आम्ही राज्य मंडळाला संपर्क साधून झाल्या प्रकाराची कल्पना दिली. त्यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणेशला रुग्णालयातून परीक्षा देण्याची परवानगी दिली. त्यामुळे माझ्या मुलाचे वर्ष वाया गेले नाही याचा आनंद वाटतो,’ असे त्यांनी सांगितले.

अपघातानंतर वर्ष वाया जाणार याची भीती होती. रुग्णालयातून परीक्षा देणे हा विलक्षण अनुभव होता. राज्य मंडळामुळे माझे वर्ष वाया गेले नाही. मंडळाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे खूप आभार मानावेसे वाटतात.

गणेश हाके