दहावीचा निकाल घटला; गुणांच्या आकडेवारीचा फुगवटा कायम
राज्याचा निकाल ८९.४६ टक्के
३९ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण
राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, या वर्षी निकाल १.९० टक्क्यांनी घटला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी गुणांच्या आकडेवारीला आलेला फुगवटा या वर्षीही कायम आहे. त्यामुळे महाविद्यालयांचे कट ऑफ गुण वाढण्याची शक्यता असून, नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे. विशेष
गुणांचा लाभ मिळालेल्या ३९ खेळाडूंना तब्बल १०० टक्के गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही या वर्षी घट झाली आहे. या वर्षी राज्याचा निकाल ८९.४६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १.९० टक्क्यांनी निकाल घटला असून, गेल्या वर्षी ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
या वर्षी निकालात घट झाली म्हणजे परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी निकालाची गुणवत्ता वाढली आहे. खेळाडूंना देण्यात आलेले विशेष गुण, अंतर्गत मूल्यमापनात सढळ हाताने देण्यात आलेल्या गुणांचा परिणाम या वर्षीच्या निकालावरही दिसतो आहे. विशेष श्रेणी आणि प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुणांच्या चढत्या भाजणीमुळे या वर्षी महाविद्यालयांचे कट ऑफही वाढणार आहेत.
या वर्षी एटीकेटीच्या सुविधेमुळे अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. राज्यात ७९ हजार ५६० विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाली असून, त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी हे अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेच्या निकालानुसार अकरावीला प्रवेश घेण्यासाठी अपात्र ठरलेल्या ८७ हजार ७०३ विद्यार्थ्यांनाही जुलैच्या परीक्षेची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्यातील काही विद्यार्थीही अकरावीला पात्र ठरू शकणार आहेत. त्यामुळे परीक्षेला बसलेले बहुतेक सर्वच विद्यार्थी अकरावीला जाणार आहेत.
गुणआकार!
आतापर्यंत दहावीच्या परीक्षेत मिळालेले ८५ टक्के गुणही खूप वाटत होते. राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याची खात्री वाटत होती.
खेळाडूंसाठीच्या विशेष गुणांचा लाभ घेणाऱ्या ३९ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील ५१ हजार २८१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. ८५ ते ९० टक्क्यांदरम्यान गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८३ हजार ९३१ आहे. उत्तीर्ण झालेल्या ७० टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्यातच या वर्षी राज्यातील सीबीएसई शाळांमध्येही गुणांची पातळी वाढली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांसाठी चुरस वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुनर्परीक्षा १८ जुलैपासून
दहावीच्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा गेल्या वर्षीपासून ऑक्टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येते. ही परीक्षा १८ जुलैपासून सुरू होणार असून, त्याचे सविस्तर वेळापत्रक येत्या आठवडय़ात जाहीर करण्यात येईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले. अनुत्तीर्ण झालेले आणि श्रेणी सुधार करण्यासाठी पुन्हा परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकणार आहेत. जुलैमधील परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना याच वर्षी अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

विभागवार निकाल
विभागाचे नाव आणि कंसात निकालाची टक्केवारी
कोकण (९६.५६), कोल्हापूर (९३.८९), पुणे (९३.३०), मुंबई (९१.९०), नाशिक (८९.६१), औरंगाबाद (८८.०५), नागपूर (८५.३४), अमरावती (८४.९९), लातूर (८१.५४)

निकाल दृष्टिक्षेपात
* परीक्षेला बसलेले नियमित विद्यार्थी – १६ लाख १ हजार ४०६
* उत्तीर्ण विद्यार्थी – १४ लाख ३४ हजार १४३. निकालाची टक्केवारी – ८९.५६
* मुलींचा निकाल – ९१.४१ टक्के
* मुलांचा निकाल – ८७.९८ टक्के
* पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी – १ लाख १८ हजार ६४१
* पुनर्परीक्षार्थीचा निकाल – ४३.५७ टक्के
* अपंग विद्यार्थ्यांचा निकाल – ८८.७३ टक्के
* रात्र शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल – ६३.६८ टक्के
* बाहेरून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल – ४७.९१ टक्के

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ssc results 2016 declared 89 56 pass percentage recorded
First published on: 07-06-2016 at 02:25 IST