13 December 2017

News Flash

केंद्राच्या मुजोरीमुळे परिवहन विभागाचा अपमान

अधिकारी म्हणून तुमचं अस्तित्व टिकवता आले नाही तर जनता नावे ठेवणारच

प्रतिनिधी, पुणे | Updated: October 13, 2017 3:53 AM

‘फ्युचर टेक्नॉलॉजीज अ‍ॅण्ड रेग्युलेशन्स फॉर ऑटोमोबाईल्स’ या विषयावरील कार्यशाळेत योगेश बाग लिखित ‘कार ड्रायिव्हग-शिका आणि शिकवा’ व  ‘अपघात आणि आपण’ या पुस्तकांचे प्रकाशन दिवाकर रावते यांच्या हस्ते गुरुवारी झाले. मनोज सौनिक, डॉ. प्रवीण गेडाम, नवीन सोनी आणि अनुपम श्रीवास्तव या वेळी उपस्थित होते.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची टीका

ई-रिक्षा, ई-बस अशा प्रवासी वाहनांना थेट परवानगी देत केंद्र सरकारने राज्यातील परिवहन खात्याला डावलले आहे. वाहन क्रमांक आणि नोंदणी याला वगळून नागपूरमध्ये ई-रिक्षा आणि ई-बसेस रस्त्यावरून धावत आहेत. केंद्राच्या मुजोरी कारभारामुळे परिवहन खात्याचा अपमान होत आहे, अशा शब्हांत तीव्र नाराजी व्यक्त करीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अप्रत्यक्षपणे नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. मोटार वाहन कायद्यांतर्गत राज्यातील प्रत्येक सार्वजनिक वाहनाची नोंद परिवहन खात्याकडे झालीच पाहिजे, अशी तंबी रावते यांनी भरली.

सोसायटी ऑफ इंडियन अ‍ॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स, सोसायटी फॉर फिटनेस अँड एनव्हिरॉन्मेंट (सेफ) आणि परिवहन विभागातर्फे आयोजित ‘फ्युचर टेक्नॉलॉजीज अ‍ॅण्ड रेग्युलेशन्स फॉर अ‍ॅटोमोबाईल्स’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन रावते यांच्या हस्ते झाले. परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सेफचे अध्यक्ष नवीन सोनी, उपाध्यक्ष अनुपम श्रीवास्तव या वेळी उपस्थित होते. योगेश बाग लिखित ‘कार ड्रायिव्हग-शिका आणि शिकवा’ व  ‘अपघात आणि आपण’ या पुस्तकांचे प्रकाशन रावते यांच्या हस्ते झाले.

केंद्राच्या या निर्णयामुळे सध्या नागपूरमध्ये वाहन नोंदणी आणि वाहन क्रमांक नसलेल्या ई-रिक्षा आणि ई-बस प्रवासी सेवा पुरवित आहेत. त्याची जबाबदारी कोणी घ्यायची?  या वाहनांना अडविण्याची हिंमत परिवहन खात्याचा अधिकारी करत नाही. हे काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करून परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंड करायला हवे होते, याकडे रावते यांनी लक्ष वेधले. वरून आले म्हणून तुम्ही गप्प बसलात. राज्यातील वाहनांना परवानगी देणे हा आमचा अधिकार आहे, हे केंद्राला ठणकावून सांगायला हवे होते. यामध्ये मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अधिकारी म्हणून तुमचं अस्तित्व टिकवता आले नाही तर जनता नावे ठेवणारच, अशी पुस्ती रावते यांनी जोडली.

वाहनांच्या पासिंगचे काम सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात रावते म्हणाले,‘ दोन दिवसांपूर्वी पुण्यात ब्रेकची चाचणी घेताना टॅम्पोचा अपघात होऊन मोटार वाहन निरीक्षक व वाहनचालक जखमी झाले.

हा अपघात टॅम्पोच्या बॉडीचे नटबोल्ट सल असल्यामुळे झाला. आता हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कसे दिसणार? चावी लावून कोणतेही वाहन सुरू केले तरी त्यामध्ये काय दोष आहे हे अधिकाऱ्यांना लगेच समजते. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याखाली तपासणीची गरज नाही. मात्र, ही आपली बाजू न्यायालयासमोर मांडण्यासाठी खासगी वकील नियुक्त करा,’ असे आदेश रावते यांनी दिले.

First Published on October 13, 2017 3:53 am

Web Title: maharashtra state road transport corporation diwakar raote transport department issue modi government