पुणे ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपा युतीला मतदारांनी जोरदार दणका दिला आहे. १० पैकी ९ विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विद्यमान सरकारमधील दोन मंत्री भाजपाचे बाळा भेगडे आणि शिवसेनेचे विजय शिवतारे या दोघांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पराभव केला. काँग्रेसमधून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील यांचाही इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या दत्ता भारणे यांनी पराभव केला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त दौेडमध्ये भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला.

दौंडचे भाजपा आमदार राहुल कूल २०१४ साली राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर जिंकले होते. अवघ्या ७४६ निसटत्या मतांनी त्यांनी यावेळी विजय मिळवला. पुरंदरची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पराभव केला. मावळमध्ये सुद्धा दोन वेळा आमदार आणि राज्यमंत्री असलेले बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी पराभव केला. शेळके यांनी भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शेळके तब्बल ९३ हजार ९४२ मतांनी विजयी झाले.

राष्ट्रवादीचे दुसरे प्रमुख नेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी बारामती आणि इंदापूरची जागा कायम राखली. इंदापूरमध्ये मोठया प्रमाणावर मतदान झाले होते. भारणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चुरशीचा सामना झाला. भारणेंनी अवघ्या ३,११० मतांनी पाटील यांचा पराभव केला. काँग्रेसने भोरची जागा कायम राखली व पुरंदरमध्ये शिवसेनेचा पराभव केला. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांच्यात सामना होता. थोपटे ९,२०६ मतांनी जिंकले.

खेड-आळंदी आणि जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला तिरंगी लढतीचा फायदा झाला. माजी आमदार दिलीप मोहिते यांनी शिवसेनेच्या सुरेश गोरे यांचा पराभव केला. शिवसेनेचे बंडखोर अतुल देशमुख यांनी ५० हजारे मते मिळवून गोरे यांचे गणित बिघडवले. जुन्नरमध्ये अतुल बेनके यांनी विद्ममान आमदार शरद सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ ला सोनावणे मनसेच्या तिकीटावर आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या आशा बुचके यांच्या बंडखोरीचा अतुल बेनके यांना फायदा झाला. बुचके यांनी अपक्ष लढून ५० हजारपेक्षा जास्त मते मिळवली. शिरुरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी भाजपाच्या बाबूराव पाचारणे यांचा १५ हजार मतांनी पराभव केला.