पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९ व्या सहित्य संमेलनाचा हिशेब आठ दिवसांत सादर करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने केली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांना पत्र पाठविण्यात आले असून त्यांनी सादर केलेला हिशेब हा नागपूर येथे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.
साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी रविवारी ही माहिती दिली. साहित्य संमेलनाचा हिशेब राज्य सरकारला आणि राज्य साहित्य संस्कृती मंडळाला सादर करावयाचा असल्याने संयोजकांकडून हा हिशेब मागविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
संमेलनाचा हिशेब देण्याचे बंधनकारक राहू नये म्हणून डॉ. पी. डी. पाटील यांनी राज्य सरकारने दिलेला २५ लाख रुपयांच्या अनुदानाचा धनादेश साहित्य महामंडळाला परत केला, याकडे लक्ष वेधले असता पायगुडे म्हणाले, साहित्य महामंडळाने संमेलन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ संस्थेला दिले होते. या संमेलनासाठी राज्य सरकारकडून अनुदानापोटी आलेल्या २५ लाख रुपयांचा धनादेश हा संस्थेने स्वीकारला आहे. त्यामुळे संमेलनाच्या खर्चासह २५ लाख रुपयांचा विनियोग कसा केला, याचा हिशेब हा त्या संस्थेला साहित्य महामंडळाला सादर करावा लागेल. त्याचा स्वागताध्यक्षांनी महामंडळाला दिलेल्या २५ लाख रुपयांच्या धनादेशाशी संबंध नाही. या दोन्ही घटना परस्पर वेगळ्या असून त्याची गल्लत करता कामा नये. त्यामुळेच संमेलनाचा हिशेब आठ दिवसांत सादर करावा, असे पत्र स्वागताध्यक्षांना तीन दिवसांपूर्वी पाठविले आहे.