News Flash

गांधी जयंतीनिमित्त शहरात स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांतर्फे शुक्रवारी शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटनांतर्फे शुक्रवारी शहरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला तसेच प्रतिमेला अनेक संस्थातर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अनेक संस्था, संघटनांतर्फे स्वच्छता अभियान, स्वच्छतेची शपथ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अनेक संस्थांनी अभिवादन केले.
भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये शहराध्यक्ष, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलिप कांबळे, तसेच सर्व मतदार संघातील आमदार, नगरसेवक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्यने भाग घेतला. भाजपतर्फे बिबवेवाडी येथे स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. पर्वती मतदार संघातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी भाजपच्या वतीने दर आठवडय़ाला साप्ताहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आमदार माधुरी मिसाळ यांनी या वेळी सांगितले. लायन्स क्लब ऑफ इन्टरनॅशनलतर्फे गांधी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वारगेट एसटी स्टॅण्डच्या स्वच्छता अभियानात माधुरी मिसाळ यांनी स्मार्ट स्वारगेट बस स्थानकासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शहर काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष अभय छाजेड यांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. एनएसयूआयतर्फे पौड रस्त्यावरील वनाज कॉर्नर येथे असलेल्या महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, तसेच रुपाली चाकणकर यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पुणे नगर वाचन मंदिरातर्फे आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण यांच्या हस्ते गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. संस्थेचे सहकार्यवाह रवींद्र घारमळकर यांचे या वेळी भाषण झाले. अहिंसा, देशप्रेम या गुणांची जोपासना तरुण पिढीने केली पाहिजे, अशी अपेक्षा घारमळकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. माईर्स एमआयटी संस्थेतर्फे महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ससून अभ्यागत मंडळातर्फे खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
वामनराव ओतुरकर महाविद्यालयातर्फे संस्थेच्या उपकार्याध्यक्षा प्रमिला ओतुरकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छतेची शपथ घेऊन शाळेची स्वच्छता केली. भाजपच्या कोथरुड मतदार संघातर्फे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोथरुड मतदार संघाचे प्रभारी संदीप खर्डेकर यांनी स्वच्छता अभियान हा एक दिवसाचा कार्यक्रम होता कामा नये, असे मत व्यक्त केले.
चिंचवड, निगडीतही कार्यक्रमभारतीय जनता युवा मोर्चातर्फे चिंचव
डगावातील मोरया गोसावी मंदिर व घाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठय़ा प्रमाणावर कचरा गोळा केला. महापालिका कर्मचाऱ्यांनी या अभियानाला सहकार्य केले. युवा मोर्चाचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. भाजपचे सरचिटणीस अमोल थोरात यांनीही निगडी प्राधिकरणात स्वच्छता मोहीम राबवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 3:48 am

Web Title: mahatma gandhi birth anniversary
Next Stories
1 पक्षाची बदनामी होईल असे निर्णय पालिकेत घेऊ नका- अजित पवार
2 तळेगावात सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून मोठय़ा प्रमाणावर दागिन्यांची लूट
3 ‘एफटीआयआय’बद्दल पुढील बैठक ७ ऑक्टोबरला मुंबईत
Just Now!
X