जातिभेद दूर करण्यासाठी शिक्षण हाच पाया आहे या उद्देशातून कार्य करणारे ‘सत्यशोधक महात्मा’ रंगभूमीवर अवतरत रसिकांशी संवाद साधणार आहेत. गो. पु. देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ नाटकानंतर आता ‘संवाद पुणे’ निर्मित प्रा. रामनाथ चव्हाण यांनी लिहिलेल्या नाटकाचा ऑगस्टमध्ये रंगभूमीवर प्रयोग होत असून, योगेश सोमण या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत.
जोतिबा, सावित्रीबाई, गोविंदराव यांच्यासह या नाटकामध्ये दहा व्यक्तिरेखा आहेत. राहुल घोरपडे यांचे संगीत असून केतकी बोरकर वेशभूषा करीत आहेत. निकिता मोघे सूत्रधार आहेत. संवाद पुणे संस्थेतर्फे ‘सत्यशोधक महात्मा’ या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (२२ जुलै) पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते होणार आहे. समताभूमी येथील महात्मा फुले वाडा येथे सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास महापौर चंचला कोद्रे, कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ नेते भाई वैद्य आणि कृष्णकांत कुदळे उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात या नाटकाच्या तालमीचा शुभारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या उपस्थितीत होत आहे, अशी माहिती संवाद पुणेचे सुनील महाजन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
गोपुंनी लोककलेचा आधार घेत महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा मुक्त प्रयोग केला, तर माझ्या नाटकामध्ये महात्मा फुले यांच्या विचारांचा धागा गौतम बुद्ध, कबीर आणि तुकाराम यांच्यापासून सुरू होतो. त्यामुळे फुले यांनी शाळा सुरू केली आणि विहीर खुली केली हे प्रसंग याही नाटकामध्ये असले तरी मांडणीमध्ये वैविध्य आहे, असे रामनाथ चव्हाण यांनी सांगितले. समकालीन मार्क्सच्या विचारांचा प्रभाव पडण्याऐवजी समाजाचा सेवक म्हणून काम करण्यात फुले यांनी धन्यता मानली. विषमतेमुळे अडाणी आणि अज्ञानी राहिलेल्या समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हाच पाया आहे ही त्यांची धारणा होती. मार्क्स वर्गव्यवस्थेविरुद्ध, तर फुले वर्णव्यवस्थेविरोधात लढले, असेही त्यांनी स्पष्ट केले.